Weather Forecast | मान्सूनला विलंब! राज्यात पुढील २, ३ दिवसांत 'या' भागांत पावसाची शक्यता | पुढारी

Weather Forecast | मान्सूनला विलंब! राज्यात पुढील २, ३ दिवसांत 'या' भागांत पावसाची शक्यता

पुढारी ऑनलाईन : राज्यात पुढील २, ३ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर ४, ५ दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे विभाग प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे. (Weather Forecast)

केरळमध्ये मान्सूनचे (monsoon) आगमन होण्यास नेहमीपेक्षा तीन ते चार दिवस उशीर झाला आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी म्हटले आहे. मान्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज यापूर्वी वर्तवण्यात आला होता. पण आता तो ७ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

सोमवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात IMD ने म्हटले आहे की, “दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांच्या वाढीमुळे परिस्थिती अनुकूल होत आहे. तसेच पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली हळूहळू वाढत आहे आणि काल ४ जून रोजी ती समुद्रसपाटीपासून २.१ किमी उंचीवर पोहोचली.”

“आग्नेय अरबी समुद्रावरील ढगांचे प्रमाणही वाढत आहे. केरळमध्ये मान्सून सुरू होण्याच्या या अनुकूल परिस्थितीत पुढील ३-४ दिवसांत आणखी सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे,” असे हवामान विभागाने पुढे म्हटले आहे. केरळमध्ये याआधी गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये २९ मे रोजी, २०२१ मध्ये ३ जूनला आणि २०२० मध्ये १ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. (Weather Forecast)

हे ही वाचा :

Back to top button