मान्सून लक्षद्वीपपर्यंत; कोणत्याही क्षणी केरळात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मान्सून रविवारी लक्षद्वीप बेटांजवळून पुढे सरकला. त्यामुळे तो आता केरळात कधीही दाखल होऊ शकतो. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात लवकरच बदल दिसतील. कोकण व मध्य महाराष्ट्रात आगामी तीन ते पाच दिवस वळीव बरसण्याचा अंदाज आहे.
उत्तर भारतात बिहार, झारखंड व पश्चिम बंगालमध्ये उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. मात्र हिमालय ते राजस्थान या भागात पाऊस पडतो आहे. दक्षिण भारतातही पाऊस वाढला आहे. दरम्यान, मान्सूनचा प्रवास अत्यंत धीम्या गतीने सुरू असून रविवारी तो लक्षद्वीप बेटांपर्यंत आला. त्यामुळे केरळात तो कोणत्याही क्षणी येईल, अशी शक्यता आहे. हवामान विभागाने मान्सून केरळात 4 जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र तो मान्सूनने चुकवला आहे.
अरबी समुद्रात वादळसद़ृश स्थिती
अरबी समुद्रात वार्याची चक्रीय स्थिती झाली असून 48 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होईल. त्यामुळे रविवारी राज्यातील बहुतांश भागात दुपारीच काळेभोर ढग दाटून आले अन् पाऊसही पडला. यामुळे राज्यात कोकण भागात 8 जून तर मध्य महाराष्ट्रात 6 जूनपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा व विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे.