राज्यातील महिलांसाठी खूशखबर; आता घरी बसून करा एसटीचे बुकिंग | पुढारी

राज्यातील महिलांसाठी खूशखबर; आता घरी बसून करा एसटीचे बुकिंग

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महिला प्रवाशांना एसटीच्या प्रवासात ५० टके सवलत मिळाली असली तरी ऑनलाईन तिकीट बुक करताना सवलत मिळत नव्हती. मात्र आता ऑनलाईन बुकिंग मधील अडचणी एसटी महामंडळाने दूर केल्या आहेत. त्यामुळे महिलांना आता ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे.

राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात महिलांना तिकीट दरात ५० टके सवलत देण्यात आली आहे. याची अंमलबजावणी १७ मार्च पासून सुरू झाली. या योजनेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दररोज सुमारे १८ लाख महिला आपल्या कुटुंबासह एसटीने प्रवास करत आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून एसटीच्या उत्पन्नात देखील वाढ झाली असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात येत आहे.

परंतु महिलांना ऑनलाईन तिकीट बुक करताना ५० टक्के सवलतीचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे महिलांना एसटी डेपो आणि अधिकृत तिकीट दलालाकडून तिकीट बुक करावे लागत होते. यामुळे महिलांची गैरसोय होत होती. याबाबत अनेक महिला प्रवाशांनी एसटी आगारात तक्रारदेखील केली होती. अखेर महिलांची ही अडचण दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने ऑनलाईन तिकीट बुकिंगमधील तांत्रिक अडचण दूर केली आहे. त्यामुळे महिलांना ऑनलाईन सुविधा प्राप्त झाली आहे.

महिला सन्मान योजनेमुळे दररोज १८ ते २० लाख महिला एसटीने प्रवास करत आहेत. गेल्या महिन्यात दररोजच्या महिला प्रवाशांची संख्या ९ लाखांनी वाढली आहे.
– शेखर चन्ने, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक एसटी महामंडळ

हेही वाचा : 

Back to top button