पुणे : नवे विमानतळ टर्मिनल सप्टेंबरमध्ये; ‘एएआय’ची माहिती | पुढारी

पुणे : नवे विमानतळ टर्मिनल सप्टेंबरमध्ये; ‘एएआय’ची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळावरील नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी खुले होणार असून, त्याची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. हे टर्मिनल सुरू झाल्यावर पुणेकर प्रवाशांचा विमानप्रवास सुखकर होणार आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, एएआय) यासंदर्भातील माहिती नुकतीच दिली.

त्यामुळे नवे टर्मिनल सुरू होण्यासंदर्भात अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नव्या टर्मिनलचे काम सुरू होते. तब्बल 475 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तो प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असून, येत्या सप्टेंबर महिन्यात पुणेकरांना या टर्मिनलचा वापर करता येणार आहे.

अशी आहेत दोन्ही टर्मिनल

जुने विमानतळ टर्मिनल : 22 हजार चौरस मीटर
नवीन विमानतळ टर्मिनल : 5 लाख चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ
जुन्या टर्मिनलची प्रवासीक्षमता : 80 लाख प्रवासी (वार्षिक)
नवीन टर्मिनल प्रवासीक्षमता : 1 कोटी 90 लाख (वार्षिक)

इमारतीला 4 स्टार ग्रीन रेटिंग…

पुणे विमानतळाच्या नव्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलची ही इमारत पूर्णत: पर्यावरणपूरक अशी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीला मिनिस्टरी ऑफ न्यू अ‍ॅड रिन्युएबल एनर्जी (एमएनआरई) आणि दी एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटकडून (टीईआरई) 4 स्टार ग्रीन रेटिंग देण्यात आले आहे, असे एएआयने सांगितले.

जुने टर्मिनल गर्दीने ओव्हरलोड…

पुणे विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला 180 ते 190 विमानांचे उड्डाण होत असून, त्याद्वारे 25 ते 30 हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. या वाढलेल्या प्रवाशांचा अतिरिक्त ताण जुन्या विमानतळ टर्मिनल आणि प्रशासकीय यंत्रणांवर पडत आहे. त्यामुळे नवीन विमानतळ टर्मिनल लवकरात
लवकर सुरू व्हावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

नव्या टर्मिनलवर या सुविधा मिळणार…

  • प्रवाशांना विमानापर्यंत पोचविणारे 5 नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज)
  • 8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर)
  • 15 लिफ्ट – 34 चेक इन काउंटर
  • प्रवासी सामान वहन यंत्रणा
  • पाच कन्व्हेअर बेल्ट
  • खाद्यपदार्थ आणि दुकानांसाठी 36 हजार चौरस फूट जागा
  • पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था
  • सुसज्ज आणि अत्याधुनिक सुविधा असलेली प्रसाधनगृहे
  • अत्याधुनिक नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल पूर्णत: वातानुकूलित
  • मनोरंजन, व्यावसायिक वापरासाठी 15 हजार चौरस फूट जागा

Back to top button