Ajit Pawar : अजित पवार मागच्या दाराने गेले | पुढारी

Ajit Pawar : अजित पवार मागच्या दाराने गेले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शरद पवारांच्या निवृत्तीचा फैसला करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेली जम्बो समितीची बैठक अर्ध्या तासात आटोपली. समितीने आपला निवृत्तीचा निर्णय फेटाळला आहे हा निरोप देण्यासाठी जे नेते सिल्व्हर ओकवर गेले त्यात सर्वांत पुढे अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे होते. हेच नेते भाजपशी सत्तेच्या वाटाघाटी करत असल्याचा संशय बळावल्याने पवारांनी निवृत्तीचा निर्णय घेत पक्ष हालवून सोडला. त्याच नेत्यांवर पवारांनी आपल्या मनधरणीची वेळ आणली, असे म्हटले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयातील बैठक संपल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी समितीचा निर्णय पत्रकार परिषदेत वाचून दाखवताच उपस्थित कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला, फटाके फोडले. फुगड्याही खेळले. हा जल्लोष इतका होता की अजित पवार यांना कार्यालयातून बाहेर पडणे कठीण होऊन बसले. अजित पवार यांना डिवचण्यासाठी कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या नावाने आणखी जोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. शेवटी कार्यकर्त्यांच्या गराड्यातून कार्यालयाबाहेर पडणे अशक्य झाल्याने अजित पवार पुन्हा कार्यालयात गेले आणि मागच्या दाराने बाहेर पडले.

समितीचा निर्णय जाहीर करणाऱ्या पत्रकार परिषदेत अजित पवार नव्हते आणि नंतर शरद पवारांच्या पत्रकार परिषदेलाही ते गैरहजर राहिले.. तोही चर्चेचा विषय झाला. समितीची बैठक आटोपून मागच्या दाराने निघून गे- लेले अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल झाल्याची चर्चा सुरू झाली. अजित पवार दिल्लीला गेल्याच्याही वावड्या उठल्या.

एका वृत्तवाहिनीशी संपर्क साधत मग अजित पवारांनी स्पष्ट केले की, मी दिल्लीला गेलेलो नाही. पुण्याला जात आहे. माझ्याबद्दलच्या चर्चा तथ्यहीन आहेत. मी सध्या नॉट रिचेबलच आहे, असे सांगतानाच आपला शनिवारपासूनचा राजकीय दौराही जाहीर करत आपण जोमाने कामाला लागलो आहोत, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button