Sharad Pawar Resigns Updates | पवार यू टर्न घेण्याची शक्यता; राजीनामा मागे घेण्यासाठी दबाव | पुढारी

Sharad Pawar Resigns Updates | पवार यू टर्न घेण्याची शक्यता; राजीनामा मागे घेण्यासाठी दबाव

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा म्हणून शरद पवार यांच्यावर पक्ष आणि पक्षाच्या बाहेरूनही दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे शरद पवार हे आपल्या निर्णयापासून माघार घेण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांनी स्वतः कार्यकर्त्यांशी बोलताना अध्यक्षपदाबाबत निर्णय घेताना तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही आणि दोन दिवसांनंतर तुम्हाला आंदोलन करावे लागणार नाही, असे सांगून निर्णयावर फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत. (Sharad Pawar Resigns Updates)

दुसरीकडे, देशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात समविचारी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शरद पवारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे देशभरातील विरोधी पक्षांनाही धक्का बसला आहे. शरद पवारांचे देशभरातील सर्वपक्षीय संबंध पाहता ते भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, याची कल्पना काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांना आहे. त्यामुळे पवारांच्या राजीनाम्यामुळे विरोधी पक्षांच्या ऐक्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या पक्षांनी शरद पवारांवर राजीनामा मागे घेण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली आहे.

शरद पवारांनी 2 मे रोजी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हलकल्लोळ सुरू आहे. त्यावर 5 तारखेला शरद पवार यांनी पक्षाचा नवा अध्यक्ष ठरविण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची बैठक होऊन पडदा पडेल, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले होते. मात्र, अध्यक्षपदाचा पेच वाढण्याची शक्यता आहे. त्यावर 6 तारखेला अंतिम निर्णय घेण्याचे संकेत खुद्द शरद पवारांनी दिले आहेत.

गेले दोन-तीन दिवस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पायर्‍यांवर पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, म्हणून आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांची शरद पवार यांनी समजूत काढली. ही समजूत काढत असताना त्यांनी आपल्याला पक्षातून, पक्षाच्या बाहेरूनही निर्णय मागे घ्यावा म्हणून दबाव वाढत आहे. तुमच्या भावनांकडे मला दुर्लक्ष करता येणार नाही. तुमच्या भावनांचा मी आदर करतो. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये निर्णय होईल आणि तुम्हाला येथे बसण्याची वेळ येणार नाही, असे सांगितले. त्यांच्या या विधानाने शरद पवार राजीनाम्यावर फेरविचार करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Sharad Pawar Resigns Updates)

पवारांनी आपला वारसदार निवडण्यासाठी 18 नेत्यांची समिती नेमली आहे. या समितीची शुक्रवारी, 5 मे रोजी राष्ट्रवादी भवन येथे बैठक होणार आहे. ही समिती अंतिम निर्णय घेईल आणि तो निर्णय आपल्यालाही मान्य असेल, असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून वाढलेला दबाव पाहता, ही समितीही शरद पवारांना अशीच विनंती करण्याची शक्यता आहे. त्यावर पवार कोणता निर्णय घेतात, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाचा फैसला होणार आहे. (Sharad Pawar News)

       

           हेही वाचलंत का? 

 

Back to top button