शरद पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीला पहिला धक्का; जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देताना आम्हाला विश्वासात का घेतलं नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच आव्हाड यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला असून ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. जितेंद्र आव्हाड मुंबईतील बैठकीला देखील उपस्थित राहिलेले नाहीत. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत भूकंप

1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ वाटचालीनंतर कुठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. कुठे थांबायचे हे मला कळते. त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतला आहे… राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय जाहीर केला आणि महाराष्ट्राचे राजकारण या धक्क्याने हादरून गेले.

'लोक माझे सांगाती' या आपल्या राजकीय आत्मकथेच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यातच शरद पवार यांनी ही घोषणा केल्याने उपस्थित कार्यकर्ते, नेते, पदाधिकार्‍यांना शोक अनावर झाला. अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्या, असा हक्काचा इशारा देत त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आणि सभागृहाबाहेर ठाण मांडले. राष्ट्रवादीचे बडे नेतेही मनधरणी करू लागले. पक्षात हा भूकंप घडवून 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी शरद पवार दुपारचे जेवण आणि विश्रांतीसाठी परतले, तरी मुंबईसह राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हलकल्लोळ सुरूच होता. शेवटी विरोधी पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, छगन भुजबळ आदी नेत्यांनी 'सिल्व्हर ओक'वर जाऊन पुन्हा शरद पवारांची मनधरणी केली. राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्या, अशी विनंती केली. तेव्हा शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करण्यास दोन-तीन दिवस द्या, असे सांगत राजकीय खळबळीच्या पहिल्या दिवसाला विराम दिला.

आपण दोन-तीन दिवसांत आपला फेरविचार जाहीर करू. मात्र, त्यासाठी पदाधिकार्‍यांनी राजीनामा सत्र थांबवावे, आंदोलने, उपोषणे करू नयेेत, अशी अटही शरद पवारांनी घातल्याचे अजित पवार यांनी माध्यमांसमोर सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष पुन्हा शरद पवारच की भाकरी फिरवण्याची सुरुवात खुद्द पवारांपासूनच सुरू होणार, यासाठी आता दोन-तीन दिवस थांबावे लागेल.

'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राची पहिली आवृत्ती आली तेव्हा त्याची एवढी चर्चा झाली नव्हती. या नव्या आवृत्तीत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या संबंधांवर नवा प्रकाश टाकल्याने गेले दोन दिवस हे आत्मचरित्र बातम्यांचा विषय बनले. मात्र, या बातम्याही फार चर्चा घडवणार्‍या ठरल्या नाहीत. या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा करून शरद पवार यांनी सारीच कसर भरून काढली. त्यांच्या या घोषणेने महाराष्ट्राचे राजकारण काही क्षण जागीच थबकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य धोक्यात आले, असे खुद्द नेत्यांना वाटू लागले. शरद पवारांशिवाय आजच्या राजकीय वादळात वाटचाल कशी करायची, असा प्रश्न छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे यासारख्या नेत्यांनीही सभागृहातच उपस्थित केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news