King Charles-III : मुंबईच्या डबेवाल्यांनी राजा चार्ल्स यांच्या राज्याभिषेकासाठी पाठवल्या 'खास' भेटवस्तू  | पुढारी

King Charles-III : मुंबईच्या डबेवाल्यांनी राजा चार्ल्स यांच्या राज्याभिषेकासाठी पाठवल्या 'खास' भेटवस्तू 

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईतील डबेवाल्यांनी ब्रिटनचा राजे चार्ल्स तिसरा (King Charles-III) यांच्या राज्याभिषेकासाठी भेटवस्तू पाठवल्या आहेत. हा राज्याभिषेक सोहळा शनिवारी, ६ मे लंडनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे येथे संपन्न होणार आहे. या राजेशाही सोहळ्याला लाखो लोक सहभागी होणार आहेत. या सोहळ्यासाठी त्यांना ब्रिटीश वाणिज्य दूतावासाकडून आल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी या डबेवाल्यांनी राजाला सोहळ्यापूर्वी भेटवस्तू देण्यासाठी पुणेरी पगडी आणि वारकरी संप्रदायामध्ये घेत असलेले उपरणे (शाल) खरेदी केले आहे. या भेटवस्तू खरेदी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे.

राजा चार्ल्स तिसरा (King Charles-III)

King Charles-III: पुणेरी पगडी आणि वारकरी संप्रदायाचे उपरणे

मुंबई डबेवाल्यांचे नेते विनोद शेटे सांगतात, “मुंबई डबेवाल्यांचे ब्रिटिश राजघराण्यांशी चांगले संबंध आहेत. राजा चार्ल्स तिसरा यांच्या लग्नाला मुंबईच्या दोन डबेवाल्यांना आमंत्रित करण्यात आले होते. हे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आता ते राजा होणार आहेत. आता आम्हाला चार्ल्स यांना पुणेरी पगडी आणि वारकरी संप्रदायात वापरत असलेले उपरणे (शाल) द्यायची आहे”. येत्या दोन दिवसात आमची भेट ब्रिटनच्या राजांपर्यंत पोहोचतील.

चार्ल्स तिसरा आणि  कॅमिला यांच्या लग्नाचेही आमंत्रण मुंबईच्या डबेवाल्यांना देण्यात आले होते. एनडीटीव्हीच्या वृत्तानूसार त्यावेळी चार्ल्स यांना महाराष्ट्रीयन पगडी आणि कॅमिला यांना साडी भेट दिली होती. तर डीएनएच्या वृत्तानूसार, राजा हॅरी आणि मेघन मार्कल यांच्याही लग्नाचं आमंत्रण मुंबईच्या डबेवाल्यांना मिळालं होतं. हा शाही विवाहसोहळा १९ मे २०१८ रोजी विंडसर कॅसलच्या सेंट जॉर्ज चॅपल चर्चमध्ये झाला. यावेळी त्यांनी मेगन मार्कलसाठी मराठमोळी पैठणी साडी आणि हॅरीसाठी कुर्ता-पायजमा आणि फेटा भेट दिला होता.

आणखी कोण भारतीय उपस्थित राहणार?

राजा चार्ल्स तिसरा याच्या शाही राज्य़ाभिषेकाला अभिनेत्री सोनम कपूर उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यात उपस्थित राहून सहभागी होणारी सोनम कपूर ही एकमेव भारतीय सेलिब्रिटी असणार आहे. त्या व्यतिरिक्त भारत सरकारच्या वतीने, उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे ५ मे आणि ६ मे रोजी राजा चार्ल्स तिसरा यांच्या राज्याभिषेकाला उपस्थित राहण्यासाठी यूकेला जाणार आहेत.

डबेवाल्यांचे ‘रॉयल’ कनेक्शन

मुंबईचे डबेवाले आणि ब्रिटनचे राज घराणे यांच्यात खूप खास संबंध आहेत.  २००३ साली प्रिंस चार्ल्स मुंबईच्या दौर्‍यावर आले होते. तेव्हा ते चर्चगेट रेल्वे स्थानकावर डबावाल्यांना भेटले. डबेवाल्यांची काम करण्याची पद्धत, स्टाईल आदी बाबींने ते प्रभावित झाले. त्यानंतर २००५ मध्ये चार्ल्स आणि कॅमिला पार्कर-बोल्स यांच्या शाही लग्नाला डबेवाल्यांना आमंत्रण दिले होते. तेव्हा दोन डबेवाल्यांनी हजेरी लावली होती. या दोघांपैकी मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे पदाधिकारी रघुनाथ मेदगे हे एक होते. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, त्यांच्या लंडन प्रवासाचा आणि इतर खर्च चार्ल्स यांनी केला होता.

हेही वाचा 

Back to top button