Air India News | पायलटनं गर्लफ्रेंडला कॉकपिटमध्ये बोलावलं अन्…; क्रू मेंबरनं सांगितलं आत काय सुरु होतं? | पुढारी

Air India News | पायलटनं गर्लफ्रेंडला कॉकपिटमध्ये बोलावलं अन्...; क्रू मेंबरनं सांगितलं आत काय सुरु होतं?

पुढारी ऑनलाईन : एअर इंडियाच्या (Air India News) ‍विमानातील आणखी एक विचित्र प्रकार समोर आला आहे. विमानाच्या पायलटने त्याच्या गर्लफ्रेंडला कॉकपिटमध्ये बोलावून कॉकपिटलाच लिव्हिंग रूम केल्याचे प्रकरण आता चर्चेत आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी दिल्ली-दुबई एअर इंडियाच्या विमानात घडलेल्या या प्रकाराबाबत पायलटच्या विरोधात क्रू मेंबरने तक्रार केली आहे. या प्रकारामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) नियमांचे उल्लंघन झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. डीजीसीएने यासंबंधी चौकशीचे आदेश दिले असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

या तक्रारीत क्रू मेंबरने आरोप केला आहे की पायलटने विमानाच्या कॉकपिटमध्ये एका महिला मैत्रिणीचे मनोरंजन केले आणि क्रूला कॉकपिटमध्ये खाद्यपदार्थ आणि पेय देण्यास सांगितले. पण क्रू मेंबरने तसे करण्यास नकार दिला. “या प्रकाराची चौकशी करण्यासाठी एअर इंडियाने एक समिती स्थापन केली आहे,” एअरलाइनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ३ मार्च रोजी एअरलाइनला क्रू मेंबरने केलेली तक्रार मिळाली होती.

या तक्रारीनुसार, AI 915 वर बोर्डिंगपूर्वीच समस्या लक्षात आली. केबिन क्रू मेंबरला पायलटची त्यांच्या रिपोर्टिंग वेळेदरम्यान वाट पाहावी लागली. नंतर त्यांना न भेटता तो विमानाकडे निघून गेला. पायलट प्रवाशांसोबत विमानात चढला. कॅप्टनने क्रू मेंबरला बिझनेस क्लासमध्ये रिकाम्या सीट असल्यास कळवण्यास सांगितले. कारण त्याची एक गर्लफ्रेंड इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत होती. पण क्रू मेंबरने बिझनेस क्लासमध्ये जागा नसल्याचे सांगितले.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर कॅप्टनने त्याच्या गर्लफ्रेंडला कॉकपिटमध्ये घेऊन येण्यास सांगितले आणि तिला आराम करण्यासाठी बंकमधून काही उश्या आणण्यास सांगितले. ती पहिल्या ऑर्ब्झव्हर सीटवर बसली. “पायलटला कॉकपिट उबदार आणि आरामदायी दिसायला हवे होते, जणू काही तो त्याच्या गर्लफ्रेंडसाठी लिव्हिंग रूम तयार करत होता. तसेच त्याने ड्रिंक्स आणि स्नॅक्सची ऑर्डर दिली आणि कॉकपिटमध्ये पाठवून देण्यास सांगितले. क्रू मेंबरने पायलटला म्हटले की, ‘कॅप्टन, मी कॉकपिटमध्ये अल्कोहोल आणून देणे योग्य नाही’. यामुळे तो खूप अस्वस्थ झाला आणि त्याचा मूड बिघडला. त्याने, मला उद्धट वागणूक दिली जसे की मी त्याच्या घरातील कामगार आहे” असे क्रू मेंबरने तक्रारीत म्हटले आहे.

सदर महिला कॉकपिटमध्ये सुमारे तीन तास वेळ होती. “सदर महिला कॉकपिटमध्ये असताना दिल्ली-दुबई प्रवासादरम्यान बिझनेस क्लासमधील जेवण आणि स्नॅक्स देण्यासाठी क्रूला अनेक वेळा बोलावण्यात आले. यामुळे इतर प्रवाशांना सेवा देणे अडचणीचे झाले.” असेही तक्रारीत नमूद केले आहे.

जेव्हा प्रवासी कॉकपिटच्या आत होता, तेव्हा पायलट त्यांच्या नेहमीच्या स्थितीत नसल्याच्या लक्षात आल्यावरही ती कॅप्टनशी बोलण्यासाठी गेली होती. यावेळी असेही दिसून आले की पहिला अधिकारी (co-pilot) उशी घेऊन झोपला होता आणि प्रभारी पायलट (pilot in charge) रिअर ऑर्ब्झव्हर स्टेशनमध्ये तिच्याकडे गप्पा मारत बसला होता. फिर्यादीने असाही आरोप केला आहे की, कॅप्टन संतापला होता आणि परतीच्या प्रवासादरम्यान त्याने अश्लिल टिप्पणी केली. (Air India News) पायलटचे हे वर्तन जोखमीचे तसेच इतर प्रवाशांसह उड्डाण धोक्यात घालणारे होते.

तपासाअंती पायलट वर शिस्तभांगाची कारवाई होवू शकते. पायलट दोषी आढळल्यास त्याचा परवाना निलंबित करण्यासारखी दंडात्मक कारवाई केली जावू शकते. एअर इंडियाकडून या घटनेसंदर्भात अद्याप कुठलाही दुजोरी देण्यात आलेला नाही. केबिन क्रु मधील एका सदस्याच्या तक्रारीच्या आधारे ही चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान विमानाच्या केबिन क्रू च्या सदस्यांना चौकशीसाठी डीजीसीएने समन्स पाठवला असल्याचे कळतेय.

हे ही वाचा :

Back to top button