पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जम्बो कोविड सेंटरच्या वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशिप डीड तयार करून निविदा मंजूर करून घेतल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्यासह चौघांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पीएमआरडीएचे अभियंता राजू लक्ष्मण ठाणगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भादवी कलम 420, 426, 465, 467 ,468, 471, 511 ,34 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. ही घटना 26/8/ 2020 ते 9 /9 /2020 यादरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सयाजीराव गायकवाड भवन, पुणे आणि जम्बो कोविड सेंटर सीओपी ग्राउंड शिवाजीनगर पुणे याठिकाणी घडलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांनी
लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या फर्मल जम्बो कोविड सेंटरच्या वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशिप डीड तयार केले. सदरची निविदा मंजूर करून घेऊन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पुढील तपास करत आहे.