Share Market Crash | सेन्सेक्सची ९५० अंकांपर्यंत घसरण, गुंतवणूकदारांना १.५ लाख कोटींचा फटका, ‘हे’ ५ घटक घसरणीमागे कारणीभूत

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

Share Market Crash : जागतिक कमकुवत संकेत आणि आयटी शेअर्समधील घसरणीमुळे आज सोमवारी (दि.१७) शेअर बाजाराचा मूड बिघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल सुमारे ८५० अंकांनी घसरून ५९,५८० पर्यंत खाली आला. तर निफ्टी २१४ अंकांनी घसरून १७,६१३ वर आला. त्यानंतर सेन्सेक्स ९५० अंकांनी घसरला. त्यानंतर सेन्सेक्स निच्चांकी स्तरावरून ४८० अंकांनी सावरला. आज सेन्सक्स ५२० अंकांच्या घसरणीसह ५९,९१० वर बंद झाला. तर निफ्टी १२१ अंकांनी घसरून १७,७०६ वर स्थिरावला. बाजारातील आजच्या विक्रीच्या दबावामुळे गुंतवणूकदारांना सुमारे १.५ लाख कोटींचा फटका बसला. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २६४.४ लाख कोटींवर आले. ते याआधी २६५.९ लाख कोटी रुपये एवढे होते.

IT शेअर्सवर दबाव

आजच्या ट्रेडिंग सत्रात सर्वाधिक IT शेअर्सवर दबाव राहिला. विक्रीचा जोर वाढल्याने IT स्टॉक्स गडगडले. आयटीमध्ये इन्फोसिस १२ टक्क्यांपर्यंत घसरला. LTIMindtree, Persistent Systems प्रत्येकी ८ टक्क्यांनी घसरले. टेक महिंद्रा, एल अँड टी टेक्नॉलॉजी ७.३० टक्के, एचसीएल टेक्नॉलॉजीचा शेअर ५ टक्क्यांनी खाली आला होता.

आघाडीच्या दोन आयटी कंपन्यांची चौथ्या तिमाहीतील कमाई आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून मे मध्ये व्याजदर वाढ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या. परिणामी भारतीय शेअर बाजारात सुरुवातीलाच मोठे नुकसान दिसून आले. आजच्या व्यवहारात IT निर्देशांक सुमारे ६ टक्क्यांनी घसरला. सेन्सेक्सवर इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक हे टॉप लूजर्स होते. विप्रो, टीसीएस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि एनटीपीसी हेदेखील घसरले. तर नेस्ले, पॉवर ग्रिड, एसबीआय, कोटक बँक आणि अल्ट्रा टेक सिमेंट हे शेअर्स वधारले. दरम्यान, आज एफएमसीजी, पॉवर आणि रिअल्टीच्या काही शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. PSU बँक, फार्मा, शुगर शेअर्समध्ये खरेदी झाली.

PSU Bank स्टॉक्स वधारले, 'हे' होते टॉप गेनर्स

Nifty PSU Bank आज २ टक्क्यांनी वाढला. यात पंजाब अँड सिंध बँक (५.५८ टक्के वाढ), युको बँक (५.३१ टक्के वाढ), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (३.७१ टक्के वाढ), इंडियन ओव्हरसीज बँक (३.१८ टक्के वाढ), युनियन बँक ऑफ इंडिया (३.१६ टक्के वाढ), बँक ऑफ महाराष्ट्र (२.१८ टक्के वाढ), इंडियन बँक (२.२३ टक्के वाढ) हे टॉप गेनर्स होते.

Infosys च्या नफ्यात घट, शेअर्स १२ टक्क्यांनी घसरले

सोमवारी Infosys चे शेअर्स १२ टक्क्यांपर्यंत घसरले. इन्फोसिसने चौथ्या तिमाहीतील कमाईत ८ टक्के वाढ नोंदवून ६,१२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. तर महसूल १६ टक्के वाढून ३७,४४१ कोटी रुपयांवर पोहोचला. Infosys चा महसूल आणि नफा हा विश्लेषकांच्या मांडलेल्या अंदाजाच्या तुलनेत कमी आहे. यामुळे इन्फोसिसचे शेअर्स कोसळले आहेत. (Stock Market Crash) यामुळे इन्फोसिसच्या बाजार भांडवलात ७३,०६० कोटींची घट झाली. इन्फोसिस शेअरची ही २०१९ नंतरची ही सर्वात खराब कामगिरी आहे. हा शेअर ५२ आठवड्यांच्या निच्चांकी पातळीवर म्हणजे १,२१९ रुपयांपर्यंत खाली आला.

एचडीएफसी बँकेच्या कमाईत घट

बँकेच्या चौथ्या तिमाहीचा नफा आणि निव्वळ व्याज उत्पन्न (NII) वाढ अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने HDFC आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स सेन्सेक्सवर घसरले. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले.

जागतिक बाजारातून संदिग्ध संकेत

अमेरिकेतील आर्थिक स्थितीचा मागोवा घेत आशिया बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. परिणामी जागतिक संकेत संदिग्ध असल्याने जपानचा निक्केई निर्देशांकाने सुरुवातीला सपाट पातळीवर व्यवहार केला. त्यानंतर निक्केई निर्देशांक २१ अंकांच्या वाढीसह २८,५१४ वर बंद झाला. दक्षिण कोरियाच्या कोस्पी ०.२ टक्के खाली आला. तर हाँककाँगचा हँग सेंग ०.२ टक्के घसरला. अमेरिकेतील निर्देशांक गेल्या आठवड्यात खाली आले होते. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीच्या शक्यतेने शेअर बाजारात चिंतेचे वातावरण आहे.

FIIs कडून खरेदीवर जोर, पण तरीही बाजाराचे गणित बिघडले

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे गेल्या ९ दिवसांत सेन्सेक्सने २,८०० अंकांची वाढ नोंदवली होती. पण आज आयटी शेअर्स घसरणीमुळे बाजाराचे गणित बिघडले. सेन्सेक्सची मोठी घसरून दिसून आली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news