Aryan Khan Case : समीर वानखेडे यांच्यावर पोलिसांची पाळत? - पुढारी

Aryan Khan Case : समीर वानखेडे यांच्यावर पोलिसांची पाळत?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

Aryan Khan Case : राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करुन उध्वस्त केलेली ड्रग्ज पार्टी आणि याप्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले. याच दरम्यान आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार एनसीबी अधिकाऱ्याने पोलिसांकडे केली आहे. एनसीबीचे मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केल्याची माहिती मिळते.

मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीच्या पथकाने २ ऑक्टोबरला छापेमारी करुन आर्यन खान याच्यासह (Aryan Khan Case) काही जणांना ड्रग्ज आणि रोख रकमेसह ताब्यात घेतले. कारवाईवेळी एनसीबीसोबत असलेल्या दोघांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काहींना सोडून दिल्याचा आरोप करण्यात आला. एनसीबीने याला उत्तर दिले आहे. त्यानंतर आता एनसीबीच्या अधिकाऱ्याकडून आता आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केली गेली आहे.

वानखेडे यांनी केलेल्या तक्रारीत काही धक्कादायक दावे केले आहेत. काही लोक माझ्या हलचालींवर लक्ष ठेऊन आहेत. हे दोघेजण वानखेडे यांच्यावर पाळत ठेवत त्यांच्या मागावर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजही हाती लागल्याची माहिती देण्यात आली आहे.

‘नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरो’ (NCB) ही तपास संस्‍था ठोस पुरावे असल्‍याशिवाय कारवाई करत नाही. आमच्‍यावरील सर्व आरोप निराधार आणि दुर्दैवी आहेत. आम्‍ही न्‍यायालयासमोर सर्व तपास तपशील देत आहोत, त्‍यामुळे आम्‍ही क्रूझवरील ड्रग्‍ज पार्टीवर केलेली कारवाई कायदान्‍वयेच केली आहे, अशी शब्‍दांत ‘नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरो’चे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली होती. क्रूझवरील ड्रग्‍ज पार्टीवर एनसीबीने केलेल्‍या कारवाईबाबत मंत्री नबाव मलिक यांनी काही प्रश्‍न उपस्‍थित केले होते.

पहा व्हिडिओ : मराठी अभिनेत्री किशोरी शहाणेंची हिंदी लव्ह स्टोरी : नवरात्री विशेष

Back to top button