‘फडतूस’ हा अतिशय सौम्य शब्द वापरला : संजय राऊतांचा फडणवीसांना टोला | पुढारी

'फडतूस' हा अतिशय सौम्य शब्द वापरला : संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेला धमक्या देवू नका. तुम्ही काडतूस असाल, पण महाराष्ट्रात भिजलेली काडतूस खूप आहेत, ती कधी उडणारच नाहीत. तुमचं खरं काडतूस ईडी आणि सीबीआय आहे. अशा सरकारला उद्धव ठाकरेंनी फडतूस हा अतिशय सौम्य शब्द वापरला, अशी टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना केलेल्या मारहाण प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. कार्यकर्त्यांवर शिंदेंच्या गुंडांकडून हल्ला होऊनही ते गप्प आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेवढ्याच तिखटपणे प्रत्युत्तर देत ‘कोण फडतूस हे अडीच वर्षांत दिसले’, असा पलटवार केला होता.

आज खासदार संजय राऊत यांनीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. रोशनी शिंदे यांच्यावर मुख्यमंत्री यांच्या गुंडाच्या टोळीने हल्ला केला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना पाहण्यासाठी उद्धव ठाकरे गेले होते. त्या महिलेवर मातृत्वासाठी उपचार सरू आहेत. तरीही मारहाण करण्यात आली. अशा परिस्थीतीत पोलिस काहीही करत नाहीत. अशा सरकारला न्यायालयाने नपुसक म्हणले आहे. उद्धव ठाकरेंनी फडतूस हा अतिशय सौम्य शब्द वापरला. फडतूसचा शब्द नागपूरला वेगळा असेल. आम्ही महाराष्ट्रातीलच आहोत आणि नागपूर हे महाराष्ट्रातीलच आहे. डिक्शनरीमध्ये फडतूसचा अर्थ एकदा पहा. हे सरकारच बिनकामच आहे, त्याला फडतूस शब्द वापरला. त्याच्यामध्ये भिजलेल्या काडतूसाएवढे घुसण्याचे कारण नाही. तुम्ही काडतूस असाल, पण महाराष्ट्रात भिजलेली काडतूस खूप आहेत. तुमचं खरं काडतूस ईडी आणि सीबीआय आहे. रोशनी यांच्यावर झालेला हल्ला महाराष्ट्राने पाहिला आहे. तुम्ही गृहमंत्री झाल्याची महाराष्ट्राला अडचणच आहे. सीबीआय, ईडी बाजूला ठेवा मग काडतूसचा अर्थ सांगतो, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीस यांच्यावर घणाघात केला.

हेही वाचा : 

Back to top button