Stock Market Closing | अस्थिर व्यवहारानंतर सेन्सेक्स ११५ अंकांनी वाढून ५९,१०६ वर बंद, जाणून घ्या दबावाचे कारण

Stock Market Closing | अस्थिर व्यवहारानंतर सेन्सेक्स ११५ अंकांनी वाढून ५९,१०६ वर बंद, जाणून घ्या दबावाचे कारण

Stock Market Closing : डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालेला रुपया आणि जागतिक बाजारातील दबावामुळे भारतीय शेअर बाजारात आज सोमवारी (दि.३) आर्थिक वर्षाच्या पहिल्या सत्रात अस्थिरता दिसून आली. तेल निर्यातदार राष्ट्रांची संघटना – 'ओपेक' (OPEC+) ने अचानक उत्पादनात कपात केल्यानंतर तेलाच्या किमतीत ६ टक्क्यांची वाढ झाली. परिणामी महागाई आणखी वाढू शकते या चिंतेने गुंतवणूकदार धास्तावले. या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. सुरुवातीला सेन्सेक्स १२० अंकांनी वाढून ५९ हजारांवर पोहोचला होता. तर निफ्टी १७,३५० वर होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांनी स्थिर पातळीवर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ११४ अंकांच्या वाढीसह ५९,१०६ वर बंद झाला. तर निफ्टी ३८ अंकांनी वाढून १७,३९८ वर स्थिरावला.

'या' शेअरची १८ टक्क्यांहून अधिक उसळी, जाणून घ्या कारण

आजच्या व्यवहारात ऑईल आणि गॅस मार्केटिंग स्टॉक्स घसरले. ऑटो स्टॉक्स तेजीत राहिले. तर FMCG आणि IT स्टॉक्सवर दबाव राहिला. बीपीसीएलचे शेअर्स ३ टक्क्यांने घसरले. तर आयशर मोटर्सचा शेअर २ टक्क्यांनी वाढला. आज १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी १० मध्ये वाढ दिसून आली. मार्चमधील मजबूत विक्रीच्या जोरावर ऑटो स्टॉक्स १.५ टक्के वाढले. गेल्या मार्च महिन्यात आणि ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षात प्रवासी वाहनांची जोरदार विक्री झाल्यामुळे आजच्या ट्रेडिंग सत्रात SML Isuzu चे शेअर्स १८ टक्क्यांहून अधिक वधारले.

ऑटो स्टॉक्स वधारले

ऑटोमध्ये अशोक लेलँड, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स, मारुती सुझूकी, टीव्हीएस मोटर कंपनी, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो हे शेअर्स तेजीत होते. यात मारुती सुझूकीचा शेअर २.४९ टक्के आणि हिरो मोटोकॉर्पचा शेअर सुमारे ३ टक्क्यांपर्यंत वाढला.

आयटीमध्ये इन्फोसिस, Persistent Systems, टेक महिंद्रा, LTIMindtree आणि टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस यांचे शेअर्स गडगडले.

एसीसी, अंबुजा सिमेंट्स वगळता अदानींचे ८ शेअर्स घसरले

एसीसी, अंबुजा सिमेंट्स वगळता अदानींच्या सर्व शेअर्सनी आज लाल चिन्हात व्यवहार केला. अदानी एंटरप्रायजेस (-२.५४ टक्के), अदानी ग्रीन एनर्जी (-४.२० टक्के), अदानी पोर्ट्स (-१.३९ टक्के), अदानी ट्रान्समिशन (-४.५७ टक्के), अदानी टोटल गॅस (-०.११ टक्के), अदानी पॉवर (-१.७७ टक्के), अदानी विल्मर (-३.०४ टक्के), एनडीटीव्ही (-३.३१ टक्के) हे शेअर्स घसरले. तर एसीसीचा शेअर सुमारे १.३७ टक्के आणि अंबुजा सिमेंटचा शेअर १.४८ टक्के वाढला.

आशियाई बाजारात तेजी

दरम्यान, आज आशियाई बाजारात तेजी दिसून आली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढून २८,१८८ वर बंज झाला. टॉपिक्स निर्देशांकही ०.५१ टक्के वाढून २,०१७ वर बंद झाला. दक्षिण कोरियाचा कोस्पी किचिंत घसरला. चीनमधील शांघाय कंपोझिट ०.७४ टक्के वाढून ३,२९६ वर बंद झाला. तर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.१४ टक्क्याने घसरला. दरम्यान, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने महागाईची तीव्रता कमी झाल्याचे संकेत दिल्यानंतर अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक शुक्रवारी वाढले होते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news