

सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचार्यांना प्राप्तिकरात सवलत मिळविण्यासाठी संपूर्ण वर्षभरात लहान-सहान कर सवलत देणार्या किंवा करमुक्त योजनेत गुंतवणूक करावी लागते. शिवाय अन्य काही खर्चांचादेखील समावेश करावा लागतो. हे खर्च कर सवलत देणारे असतात. जसे की पाल्यांचे शैक्षणिक शुल्क, गृहकर्जावरील हप्ता आदी. या खर्चापोटी किंवा गुंतवणुकीपोटी कर्मचार्यांकडून कर सवलतीचा दावा केला जातो. विशेष म्हणजे संबंधित कागदपत्रे किंवा पुरावे सादर केल्यानंतरच या कर सवलतीचा लाभ दिला जातो. ही कागदपत्रे कंपनी कार्यालयात मार्च महिन्यात जमा करावी लागतात. यासाठी ही कागदपत्रे सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.
एखाद्या कारणाने कर बचतीचे प्रमाणपत्र किंवा खर्चाचे कागदपत्र कंपनीकडे जमा करू शकलो नाही, तर घाबरू नका. 31 मार्चच्या आत कागदपत्रे जमा करता येतात. वेळेत सादर न केल्यास कर भरावा लागेल, हे देखील तितकेच खरे.
कागदपत्रे जमा न केल्यास
आपण कर सवलत मिळविण्यासाठी केलेली गुंतवणूक आणि खर्चाचे विवरण कंपनीकडे 31 मार्चपर्यंत सादर न केल्यास कंपनीकडून मार्च महिन्यात वेतनातील संपूर्ण रक्कम कररूपाने वसूल केली जाते. अशा वेळी कर्मचार्यांच्या हाती एक रुपयाही पडत नाही. कारण संपूर्ण वेतन हे कर आकारणीमुळे कापले जाते. म्हणूनच 31 मार्चपूर्वी कोणत्याही स्थितीत संपूर्ण कागदपत्रे सादर करायल हवीत.
कर सवलत कशावर मिळते?
प्रप्तिकर विभागाकडून करबचत सवलत देणार्या अनेक योजना आहेत. त्यानुसार 80 सी कलमानुसार दीड लाखांपर्यंत गुंतवणुकीवर दावा करता येतो. ही कर सवलत ईपीएफ, पीपीएफ, जीवन विमा पॉलिसी, कर बचत मुदत ठेवी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यावर दिली जाते. तसेच गृहकर्जापोटी मूळ रकमेवर भरण्यात येणारा हप्ता आणि मुलांचे शैक्षणिक शुल्क या खर्चावरदेखील करबचतीचा दावा करता येतो. अर्थात, ही कर सवलत केवळ दीड लाख रुपयांपर्यंतच आहे. त्यावरची रक्कम ही कर सवलतीच्या बाहेर गृहीत धरली जाईल. शिवाय प्राप्तिकर कायद्याच्या कलम 24 नुसार गृहकर्जापोटी भरण्यात येणार्या हप्त्याच्या व्याजावरही कर सवलत मिळते. शैक्षणिक कर्जाच्या व्याजावरदेखील कर सवलतीसाठी दावा करता येतो.
कंपनीकडे कागदपत्रे देणे गरजेचे
या गुंतवणूक पर्यांयांपैकी कोणत्याही योजनेत पैसे जमा केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र आणि पुरावे सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. संबंधित कागदपत्रांची झेरॉक्स काढून ती प्रत कंपनीकडे जमा करताना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. आपण अद्याप कागदपत्रे जमा केली नसतील, तर 31 मार्चपर्यंत गुंतवणुकीची कागदपत्रे जमा करता येतात आणि त्यासाठी कंपनीला विनंती करावी लागेल. अशी चूक होऊ नये यासाठी पुढील वर्षी 15 ते 20 मार्चपर्यंत गुंतवणूक आणि खर्चासंबंधीचे सर्व पुरावे आणि प्रमाणपत्र कंपनीकडे जमा करण्याबाबत सजग राहावे.
भाड्याच्या घरावर सवलत
नोकरदार वर्गाला घरभाड्यावर कर सवलत मिळते. अर्थात, ही सवलत 80 सी नुसार मिळत नाही. परंतु ही सवलतीचे आकलन हे कंपनीकडून मिळणार्या हाऊस रेंट अलाऊन्स (एचआरए) रकमेवर अवलंबून आहे. याशिवाय आपले घरभाडे एक लाखांपेक्षा अधिक असेल, तर घर मालकाच्या पॅनकार्डची झेरॉक्स भाड्याच्या पावत्यांबरोबरच जमा करावी लागेल. जर घरभाडे एक लाखांपेक्षा कमी असेल, तर केवळ भाडेपावती जमा करणे पुरेसे आहे.
घोषणेनुसार गुंतवणूक नसेल तर
कंपनीकडून नोकरदार वर्गाला आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला डिक्लेरेशनचा फॉर्म दिला जातो. त्यानुसार एखादा कर्मचारी येत्या आर्थिक वर्षात किती गुंतवणूक आणि खर्च करणार आहे आणि किती कर सवलत मिळवू इच्छित आहे, याची संभाव्य माहिती देतो. कंपनीकडून या आधारे वेतनातून कपात केली जाते. कर्मचार्याने घोषणेनुसार गुंतवणूक केली नाही, तर कंपनीकडून उपलब्ध गुंतवणूक आणि खर्चाच्या प्रमाणपत्राच्या आधारे मार्चच्या सुरुवातीला कराची आकारणी करते. अशा वेळी कर अधिक असेल, तर संबंधित कर्मचार्याच्या मार्चच्या वेतनातून त्याची कपात केली जाते.
जगदीश काळे