९ वर्षे देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांची डिग्री काढणं योग्य नाही : अजित पवार | पुढारी

९ वर्षे देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांची डिग्री काढणं योग्य नाही : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सभेत गैरहजेरी म्हणजे नाराजी असं अजिबात नाही, माध्यमांनी खुर्चीवर बोलू नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. विरोधी पक्षनेते अ‌जित पवार म्हणाले- प्रत्येक सभेला सगळेच उपस्थित असेल असे नाही. सभेत गैरहजेरी म्हणजे नाराजी असं अजिबात नाहीये. प्रत्येक सभेत २-२ नेते बोलतील असं धोरण स्वीकारलंय. राज्यभर मविआच्या सभा होणार आहेत. उद्धव ठाकरेंना पाठीचा त्रास असल्यामुळे त्यांना वेगळी खुर्ची होती. प्रसारमाध्यमांनी कुणी कुठल्या रांगेत बसलं, याविषयी बातम्या देऊ नयेत.

रिक्षावाला या शब्दाबद्दल बोलताना ते म्हणाले-रिक्षावाला हा शब्द शरद पवारांचा नाही. अरविंद सावंत यांनी स्वत: स्पष्ट केलं आहे की, रिक्षावाला शब्द त्यांचाच आहे. शरद पवारांनी सर्वांचाच आदर केला आहे.

सभेविषयी बोलताना त्यांनी आवाहन केलं की, सभेत टार्गेट करून दंगा करू नये. जातीय सलोखा ठेवून सर्वांनी एकमेकांना साथ देऊया. एखाद्याने वाईट कृत्य केलं तर ती विकृती आहे.

नरेंरद्र मोदी यांच्या पदवीविषयी बोलताना ते म्हणाले-९ वर्षे देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांची डिग्री काढू नये. आतापर्यंत देशाचे अनेक पंतप्रधान झाले त्यांना बहुमताचा आदर करून निवडून दिलंय. ज्यांना बहुमत आहे, ते प्रतिनिधी झाले, डिग्रीचं काय घेऊन बसलाय? नोकरभरती, शेतकरी प्रश्न, सर्वसामान्य, कामगारांचे प्रश्न, महागाई आणि बेरोजगारीचे असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. मंत्र्यांच्या शिक्षणाबद्दल चर्चा करू नये. आपण देशाला मागे का नेत चाललोय.

मुघलांचा इतिहास पुस्तकातून हटवला तरी इतिहासात नोंद राहिल. इतिहासाला का घाबरता असा प्रश्न अजित पवार यांनी योगी सरकारला विचारला आहे. दंगलीबाबत आरोपांचं राजकारण करण्यापेक्षा पोलिसांनी तपास करावा. पोलिस तपासात मात्र कोणताही राजकीय हस्तक्षेप नको. चौकशीअंती दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असेही त्यांनी नमूद केले.

Back to top button