छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर अतिसंवेदनशीलतेचा शिक्का फार आधीपासून आहे. दंगलीचा इतिहास असल्याने येथील पोलिस नेहमी अलर्ट असतात. मात्र, सरकारच्या दुर्लक्षामुळे सहायक पोलिस आयुक्तांच्या आठपैकी पाच जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. येणारा काळ आणखी कठीण आहे. त्यामुळे सह पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांची पदे वाढविणे गरजेचे आहे. नवीन पदे मंजूर करणे सोडा, सरकारने किमान रिक्त पदे तरी तत्काळ भरावीत आणि नव्या दमाचे पोलिस अधिकारी येथे पाठवावेत.
रामनवमीच्या पूर्वसंध्येला बुधवारी रात्री किराडपुरा येथील राम मंदिरासमोर वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर वाद निवळला. रात्री ११ वाजता झालेल्या या वादाचे पडसाद मध्यरात्रीनंतर पहाटे दीड वाजता उमटले. एक गट निघून गेल्यावर दुसऱ्या गटाने पोलिसांना टार्गेट करून तुफान दगडफेक करीत पोलिसांची तब्बल १४ वाहने जाळली. दोन तास दंगेखोरांनी हैदोस घातला. या वेळेत पोलिसांनी अनेकदा त्यांना समजावून सांगितले; परंतु दंगेखोरांनी पोलिसांचेही ऐकले नाही. अखेर, पोलिस निरीक्षक गीता बागवडे आणि अशोक भंडारे या दोघांनी निर्भिड होऊन जमावाच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर जमाव पांगला. तत्पूर्वी दोन तास पोलिसदेखील हतबल झाले होते. रात्रीची वेळ होती. सर्व ठाण्यात उपलब्ध मनुष्यबळ हे अतिशय कमी होते. अनेक ठाण्यात तर श्रेणी उपनिरीक्षक किंवा सहायक उपनिरीक्षक ड्यूटी अधिकारी होते. निर्णय घेणारे अधिकारी फिल्डवर नव्हते. पोलिसांच्या कामातील या उणिवा नंतर समोर आल्या. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसारख्या अतिसंवेदनशील शहरात तरी सरकारने महत्त्वाची पदे रिक्त ठेव नयेत.