Salman Khan | सलमान खानला हायकोर्टाकडून मोठा दिलासा, पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरणी फौजदारी कारवाई रद्द | पुढारी

Salman Khan | सलमान खानला हायकोर्टाकडून मोठा दिलासा, पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरणी फौजदारी कारवाई रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्रकाराशी गैरवर्तन प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Bollywood actor Salman Khan) याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगून उच्च न्यायालयाने सलमान खान विरुद्धची फौजदारी कारवाई रद्द केली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी गुरुवारी सकाळी हा आदेश दिला. सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्डवर पत्रकाराला कथित मारहाण केल्याचा आरोप होता. जेव्हा सलमान सायकलवरुन जात होता तेव्हा पत्रकार त्याचा व्हिडिओ बनवता होता. त्यावेळी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डने पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतला होता.

या प्रकरणी २०१९ मध्ये अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांनी पत्रकाराच्या तक्रारीवरून सलमान खानला समन्स बजावले होते. यावर सलमान खानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सलमानला दिलासा देत समन्सला स्थगिती दिली होती.

काय होते प्रकरण?

पत्रकार अशोक पांडे यांनी अंधेरीचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर आर खान यांच्या न्यायालयात आयपीसी कलम ३२३ (दुखापत करणे), ३९२ (चोरी) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. ही कथित घटना २४ एप्रिल २०१९ रोजी सकाळी घडली जेव्हा सलमान खान सायकलवरून जात होता आणि त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे दोन बॉडीगार्ड होते. पांडे यांच्या म्हणण्यानुसार, ते कारमधून जात होते आणि सलमानला पाहून त्यांनी त्याच्या बॉडीगार्डच्या परवानगीने सलमानचे व्हिडिओ शुटिंग सुरू केले. पण, यामुळे सलमान संतापला. त्यानंतर त्याच्या बॉडीगार्डनी त्याच्या गाडीकडे धाव घेतली. त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. सलमानने मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप पांडे यांनी केला होता. पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नाही. यामुळे त्याला न्यायालयात जावे लागल्याचे त्यांचे म्हणणे होते.

सलमान खानची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला की, सलमानने केवळ त्यांच्या बॉडीगार्डना पत्रकाराला त्यांचे फोटो/व्हिडिओ काढण्यापासून रोखण्यास सांगितले होते.

तक्रारदार पत्रकाराचे वकील फाजिल हुसैन यांनी दावा केला की, या घटनेनंतर तक्रारदाराला मानसिक आघात सहन करावा लागला आणि त्यामुळे पहिल्यांदा तक्रार दाखल करताना अभिनेत्याच्या नावाचा उल्लेख नव्हता. मात्र, त्यानंतर नोंदवलेल्या जबानीत त्यांनी खान यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे सांगितले.

हे ही वाचा :

Back to top button