Salman Khan Threat Mail : सलमान खानला पुन्हा धमकी; मुंबई पोलिसांनी घराबाहेर सुरक्षा वाढवली | पुढारी

Salman Khan Threat Mail : सलमान खानला पुन्हा धमकी; मुंबई पोलिसांनी घराबाहेर सुरक्षा वाढवली

पुढारी ऑनलाइन डेस्क : सिनेअभिनेता सलमान खान याला ईमेलवरून पुन्हा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. मागील वर्षी चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी सलमानचा मित्र प्रशांत गुंजाळकर यांच्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यात रोहित गर्ग, गोल्डीभाई ऊर्फ गोल्ड बार आणि लॉरेन्स बिष्णोई या तिघांविरुद्ध कट रचून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. हा मेल रोहितच्या मेल आयडीवरून आल्याचे तपासात उघडकीस आले असून या मेलची सायबर सेलकडून तपासणी सुरू आहे.

प्रशांत गुंजाळकर हे वांद्रे येथील कॉपर चिमणीजवळील नूतन हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहतात. सलमान खान हा त्यांचा अनेक वर्षांपासून मित्र असून त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे प्रशांत यांचे सलमानच्या घरी नेहमी येणे-जाणे असते. गेल्या वर्षी जून महिन्यांत सलमानचे वडिल सलीम खान हे मार्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी त्यांना एक चिठ्ठी सापडली होती.

या चिठ्ठीत त्यांच्यासह सलमानला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर सलीम खान यांच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर काही दिवसांपूर्वी लॉरेन्स डिसोझा याने तुरुंगातून दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर सलमानच्या सुरक्षेची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली होती.

शनिवारी प्रशांत गुंजाळकर हे सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील राहत्या घरी होते. दुपारी पावणेदोन वाजता त्यांना जॉर्ड पटेल यांच्या मेलवर आलेला मेल निदर्शनास आला. हा मेल रोहित गर्ग नावाच्या एका व्यक्तीने पाठविला होता. या मेलवरुन संबंधित व्यक्तीने सलमानला अप्रत्यक्षपणे जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी वांद्रे पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करीत आहेत.

Back to top button