काँग्रेस आंदोलन बैलगाडी तुटली; नेते कोसळले

काँग्रेस आंदोलन
काँग्रेस आंदोलन
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : इंधन दरवाढीने सामान्य माणसाच्या डोक्यावर वाढलेले महागाईचे ओझे असह्य झाल्याने बैलगाडी मोर्चासह मुंबई काँग्रेस चे नेते शनिवारी रस्त्यावर उतरले खरे, मात्र बैलगाडीचीही अवस्था सामान्य माणसासारखीच झाली.

एकापेक्षा काँग्रेस चे एक वजनदार नेते बैलगाडीवर चढत राहिले आणि त्यांचे ओझे असह्य होऊन शेवटी या बैलगाडीने दम तोडला. गाडीचे साटे तुटले आणि वर हातात गॅस सिलिंडर, घोषणा फलक घेऊन उभे असलेले नेते जमिनीवर आदळले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, 13 पेक्षा अधिक नेते चढल्याने बैलगाडी तुटली. या धांदलीत मोर्चाचे नेतृत्व करणारे मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हुकूमराज मेहता, मुंबई काँग्रेस

च्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव, मुंबई काँग्रेस युवा मोर्चाचे गणेश यादव, दक्षिण मध्य मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदीप शुक्ला व सुभाष पिसाळ यापैकी कुणीही जखमी झाले नाही.

बैलगाडीचे मालक शिवडीचे रहिवासी बाळू जाधव यांनाही काहीच लागले नाही. मात्र महागाईविरोधातील मोर्चात उतरलेल्या बैलगाडीचे ओझे वाहणारा जाधव यांचा बैल राजा जखमी झाला.

शनिवारी मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात हा प्रकार घडला. महागाईविरोधी आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. भाई जगताप बैलगाडीवर चढून घोषणा देऊ लागले. समोर माध्यमांचे कॅमेरे होतेच. कॅमेर्‍यांसमोर यावे म्हणून खाली उभे असलेले आंदोलकही एकेक करून बैलगाडीवर चढू लागले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न जगताप यांनी करून पाहिला. पण एकदा कॅमेर्‍यात दिसू द्या, मग उतरतो, असे म्हणत कार्यकर्ते गाडीवर उभे राहून सिलिंडर उंचावत राहिले.

शेवटी बैलगाडीवर एक बाजूला वजन वाढले आणि बैल आणि मुख्य गाडी यांना जोडणारा लोखंडी रॉड वाकला. बैलगाडी एक बाजूला उलटली आणि भाई जगताप यांच्यासह बैलगाडीवरील आंदोलक खाली एकावर एक कोसळले.बैलदेखील काही अंतर फरफटले गेले.

बैलगाडीवर लावलेली चौकोनी कमान हातात असल्याने जगताप व अन्य काही नेते पडले नाहीत. त्या कमानीचा आधार घेत ते बाहेर पडले.

मात्र त्यानंतर आंदोलन तत्काळ गुंडाळून आंदोलक आणि भाई जगताप यांनी काढता पाय घेतला. मात्र पुढे कलिना आणि प्रतीक्षानगर, सायनमध्ये झालेल्या आंदोलनात जाऊन जगताप सहभागी झाले.

पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसचे वाढते दर आणि महागाईविरोधात भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनाचा शनिवारी चौथा दिवस होता. दिवसभर 31 वॉर्ड्समध्ये मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.

केंद्रावर टीकास्र

अंबानी-अदानीसारखे श्रीमंत उद्योगपती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र आहेत, मग गरिबांचे काय, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसचे वाढते दर आणि महागाईमुळे देशातील गरीब जनतेचे होणारे हाल या आंधळ्या, मुक्या व बहिर्‍या मोदी सरकारला दिसत नाहीत का?असा सवाल भाई जगताप यांनी केला. केंद्रामध्ये पण एवढे निर्लज्ज, गरीबविरोधी सरकार यापूर्वी कधीच पाहिले नाही, असे टीकास्रही जगताप यांनी सोडले.

राजकीय करमणूक !

मुंबई काँग्रेसच्या आंदोलनाची फजिती झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यातून मोठीच राजकीय करमणूक करून घेतली. विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य नेत्यांनी भरपूर टोलेबाजी केली.

प्राण्यांना इजा केली म्हणून जगतापांविरुद्ध तक्रार

पेट्रोल दरवाढीच्या विरोधातील आंदोलनाच्या नौटंकी दरम्यान एकाच बैलगाडीवर 20 पेक्षा जास्त लोक बसून बैलांसोबत क्रूर वागणूक देत त्यांना शारीरिक इजा दिल्याप्रकरणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व त्यांच्या सर्व सहकार्‍यांच्या विरोधात प्राणी क्रूरता कायद्याच्या कलम 11 व भारतीय दंड संहिता कलम 428 नुसार तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

फडणवीसांनी उडवली खिल्‍ली

राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटल्याचे बैलांनाही आवडलेले दिसले नाही.म्हणून बैलबंडी तुटली.असो काँग्रेसला माझ्या शुभेच्छा!" अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची खिल्ली उडवली.

आंदोलनाचे हसे झाले

राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हटल्याचे बैलांनाही आवडलेले नाही. एकदम ढिसाळ आंदोलन होते. बैलगाडीवर चढताना महिलांचीही काळजी घेण्यात आल्याचे दिसले नाही,अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

गाढवांचा भार, बैलांचा नकार

'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार, अशा शब्दांत आमदार प्रसाद लाड यांनीही ट्विट करून या आंदोलनाची खिल्ली उडवली. तुम्हाला सांगू इच्छितो की, माणसाने झेपेल तेवढंच करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा! ,असा टोला लाड यांनी लगावला .

जगतापांचे प्रत्युत्तर

या सगळ्यांच्या टीकेचा समाचार मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी घेतला.माझ्या पडण्याच्या व्हिडीओसाठी इतके उत्सुक असलेले सर्व भाजप नेते,जर देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी तितकेच उत्सुक असते तर आज देशाची स्थिती अशी झाली नसती,असे प्रत्युत्तर जगताप यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news