क्रिकेट : भारत-श्रीलंका मालिका आता १८ जुलैपासून | पुढारी

क्रिकेट : भारत-श्रीलंका मालिका आता १८ जुलैपासून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

श्रीलंका संघात कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यातील निर्धारित षटकांची क्रिकेट मालिका आता 18 जुलैपासून सुरू होणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी शनिवारी याची माहिती दिली.

ही मालिका यापूर्वी 13 जुलैपासून सुरू होणार होती. पण, श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर आणि डाटा विश्लेषक जी. टी. निरोशन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मालिका चार दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. श्रीलंकेचा संघ हा ब्रिटनचा दौरा करून परतला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका 18 जुलैपासून सुरू होणार आहे, असे जय शाह यांनी सांगितले. तीन एकदिवसीय सामने हे 18, 20 आणि 23 जुलैला प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहेत; तर टी-20 सामने 25 जुलैपासून सुरू होतील. शेवटचे दोन टी-20 सामने 27 व 29 जुलैला पार पडतील.

शाह यांनी बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, परिस्थितीची जाणीव आम्हाला आहे. बीसीसीआय आगामी मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेटला पूर्ण सहकार्य करेल. आमची मेडिकल टीम ही श्रीलंका क्रिकेटच्या डॉक्टरांच्या संपर्कात आहे. आम्ही सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहोत.

श्रीलंका क्रिकेटपटूसाठी बनविण्यात आलेल्या दोन बायोबबलमधील एकात यजमान संघाचा एक क्रिकेटपटू पॉझिटिव्ह असल्याचे कळते आहे. कोरोनामुळे मालिका पाच दिवसांनी पुढे ढकलल्यानंतर खेळाडू दोन गटांत वेगवेगळे सराव करत आहेत.

फलंदाज वीराक्कोडीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 26 क्रिकेटपटूंचा एक गट डांबूला येथे बायो बबलमध्ये आहे.

Back to top button