Stock Market Closing : वाढती आर्थिक आव्हाने आणि जागतिक कमकुवत संकेतांमुळे शेअर बाजारात आज मंगळवारी (दि.२८) दबाव दिसून आला. शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १२० अंकांनी वाढून ५७,७७९ वर होता. निफ्टीने १७ हजारांवर केला. त्यानंतर दोन्ही निर्देशांक स्थिर पातळीवर आले. आज सेन्सेक्स ४० अंकांच्या घसरणीसह ५७,६१३ वर बंद झाला. तर निफ्टी ३४ अंकांनी घसरून १६,९५१ वर स्थिरावला.
मिडकॅप शेअर्समध्ये आज अधिक दबाव दिसून आला. कच्च्या तेलाच्या किमतीतील ४ टक्के वाढीमुळे ऑईल मार्केटिंग शेअर्सवरही दबाव राहिला. IOC, बीपीसीएल २ टक्क्यांपर्यंत घसरले. बाजारात एकूणच आज अस्थिर वातावरण दिसून आले. मेटल शेअर्स तेजीत राहिले. पण पॉवर, ऑईल आणि गॅस शेअर्सवर दबाव राहिला. फायनान्सियल वगळता आज अन्य क्षेत्रीय निर्देशांकात घसरण दिसून आली. ऑईल आणि गॅस स्टॉक्स सुमारे १ टक्क्याने खाली आले. आज शेअर बाजारात वरच्या स्तरावरून विक्री दिसून आली.
दुपारच्या सत्रात सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, टाटा स्टील, टीसीएस हे टॉप गेनर्स होते. तर टेक महिंद्रा, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, मारुती सुझूकी, लार्सेन हे टॉप लूजर्स होते.
अदानी समूहाच्या सर्व १० शेअर्सचे आज पुन्हा नुकसान झाले. यात अदानी एंटरप्रायजेस (-७.३६ टक्के), अदानी ग्रीन एनर्जी (-५ टक्के), अदानी पोर्टस् (-६.४० टक्के), अदानी ट्रान्समिशन (-५ टक्के), अदानी टोटल गॅस (-५ टक्के), अदानी पॉवर (-५ टक्के), अदानी विल्मर (-४.९९ टक्के), एसीसी (-४.१४ टक्के), अंबुजा सिमेंट (-३.४९ टक्के), एनडीटीव्ही (-४.८६ टक्के) यांचा समावेश होता.
आज बहुतांश आशियाई बाजारात तेजी राहिली. अमेरिकेतील आर्थिक संकटात सापडलेली सिलिकॉन व्हॅली बँक फर्स्ट सिटिझन्स ताब्यात घेणार घेणार आहे. बँकिंग क्षेत्रावर आलेल्या या संकटाची तीव्रता कमी झाल्याने गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक १ टक्क्यांने वाढला. तर शांघाय निर्देशांक घसरला. टोकियोतील बाजार वधारून बंद झाला. सिडनी, सिंगापूर आणि सेऊल येथील बाजारातही वाढ दिसून आली. युरोपातील लंडन, फ्रँकफर्ट आणि पॅरिस येथील बाजारातही सकारात्मक वातावरण होते.
हे ही वाचा :