प्राप्तिकर विभागाने करदात्यांना त्यांची कर संबंधित माहिती ही वार्षिक माहिती पत्रकात (एआयएस) किंवा सारांश रूपामध्ये (टीआय एस) पाहता यावी यासाठी दि. 22 मार्चपासून 'AIS for Taxpayer'- अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट फॉर टॅक्सपेअर' या नवीन मोबाइल अॅपची सुविधा सुरू केली आहे. हे अॅप करदात्यांसाठी खूप महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरणारे आहे.
नवीन आर्थिक वर्ष अर्थात 1 एप्रिलपासून करदात्याला फॉर्म 26 एएससाठी त्याच्या गुंतवणुकीचा, स्रोतावरील कर वजावटीचा (टीडीएस)आणि स्रोतावरील कर संकलनाचा (टीसीएस) अचूक मागोवा घेणे शक्य होणार आहे. करदाते या अॅपचा वापर करून टीडीएस, टीसीएस, व्याज, लाभांश, शेअरचे व्यवहार, कर भरणे, प्राप्तिकर परतावा, जीएसटी, तसेच विदेशी हस्तांतरणे याची माहिती सहज पाहू शकतील. वापरकर्त्याला अॅपसंबंधित प्रतिसाद नोंदवण्याचीही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
करदात्यांना आपल्या भरलेल्या आगाऊ कराचे हप्ते, स्व-मूल्यांकन कर, प्राप्तिकर परतावा, वित्तीय व्यवहारांचे विवरण (एसएफटी) आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परतावा संबंधित उलाढाल इत्यादींसाठी या अॅपचा जास्त उपयोग होईल.
वार्षिक माहितीपत्रक (एआयएस) यामुळे करदात्यांना फॉर्म 26 एएससाठी त्याच्या गुंतवणुकीचा, स्रोतावरील कर वजावटीचा (टीडीएस) आणि स्रोतावरील कर संकलनाचा (टीसीएस) अचूक मागोवा घेणे शक्य होते. त्यामुळे करदात्याला टीडीएस, टीसीएस, व्याज, लाभांश, शेअरचे व्यवहार, कर भरणे, प्राप्तिकर परतावा, जीएसटी, तसेच विदेशी हस्तांतरणे याची एकत्रित माहिती सहज मिळते.
या अॅपचा करदात्यांना त्यांची संपूर्ण माहिती प्रदान करणे आणि ऑनलाईन फीडबॅक देणे, ऐच्छिक प्रोत्साहन देणे आणि कर रिटर्न सुलभपणे भरण्याची क्रिया सक्षम करणे, हा मुख्य उद्देश आहे. पूर्वी करदाते वर्षातून एकदा त्यांच्या उत्पन्नाचा तपशील देत असत आणि त्यानंतर सरकार उपलब्ध असलेल्या निवडक माहितीच्या आधारावर करदात्याचे नियोक्ते, बँका यांसारख्या इतर प्राधिकरणांनी घोषित केलेली मूल्ये, नियम-अटी आणि सादर केलेली माहिती यांच्यात काही तफावत आहे का, याची तपासणी करत असे. आता, करदात्यांनी वर्ष संपल्यानंतर वर्षभरात याचा मागोवा अपडेटेड ठेवणे आवश्यक आहे. हे अॅप करदात्यांना त्यांची माहिती अपडेट ठेवण्यास खूप मदत करेल.
'एआयएस' हे अॅप 'गुगल प्ले' किंवा अॅप स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करून घेता येईल. हे अॅप वापरण्यासाठी, करदात्यांनी त्यांचा पॅन क्रमांक देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला 'ओटीपी' आणि ई-फायलिंग पोर्टलवर ई-मेलद्वारे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. प्रमाणीकरणानंतर, चार अंकी पिन सेट करून करदात्याला हे अॅप वापरता येईल.