मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामात पारदर्शकतेचा अभाव: कॅगचा अहवाल सभागृहात सादर | पुढारी

मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामात पारदर्शकतेचा अभाव: कॅगचा अहवाल सभागृहात सादर

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या कामाचे कॅगकडून ऑडिट करण्यात आले आहे. यात निधीचा गैरवापर केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष करून कोरोना काळात केलेल्या कामांचे ऑडिट करण्यात आले असून यामध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून आला आहे. कॅगचा हा अहवाल ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फडणवीस यांनी कॅगचा अहवाल सभागृहात सादर केला. यावेळी ते बोलत होते.

मुंबई महापालिकेच्या १२ हजार कोटींच्या कामाचे ऑडिट कऱण्यात आले आहे. यामध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून आला आहे. या अहवालामुळे भोंगळ कारभार उघड झाला आहे. निधीचा गैरवापर केल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. महापालिकेच्या २ विभागांची २० कामे टेंडरशिवाय देण्यात आलेली आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागात निविदा न मागवताच टेंडर देण्यात आले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कामांचे बजेट वाढविण्यात आलेले आहे. रस्ते आणि वाहतूकमध्ये ५१ कामे सर्व्हेशिवाय केली आहेत.

२१४ कोटींची कामे टेंडरशिवाय करण्यात आली आहेत. ६४ ठेकेदार आणि महापालिकेमध्ये करार झालेले नाहीत. सॉलिड वेस्टच्या कामात पालिकेकडून हलगर्जीपणा केल्याचे अहवालात म्हटले आहे. शहरातील मिठी नदीच्या प्रदूषणाबाबतची कामे ४ ऐवजी एकाच कंत्राटदाराला देण्यात आली. अशी एकूण १२ हजार कोटींच्या कामाची चौकशी करण्यात आली आहे. यात निधीचा निष्काळजीपणाने वापर करण्यात आल्याचे आढळून आले आहे. तसेच मान्यता नसताना बीएमसीने कामे दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही कराराशिवाय कामे केल्याने महापालिकेला कारवाई करण्याचा अधिकार नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button