Sharad Pawar | शरद पवारांच्या दिल्लीत हालचाली, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बोलावली बैठक | पुढारी

Sharad Pawar | शरद पवारांच्या दिल्लीत हालचाली, विरोधी पक्षांच्या नेत्यांची बोलावली बैठक

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांची गुरुवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) च्या मुद्यावर चर्चा केली जाणार आहे. ही बैठक दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. याबाबत पवारांनी सर्व विरोधी नेत्यांना पत्र लिहिले होते. या पत्रात शरद पवार यांनी म्हटले आहे की, ज्यांना ग्रामीण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) कार्यक्षमतेबद्दल शंका आहे अशा सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे.

ईव्हीएमबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्याचे आश्वासन मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहे. त्यानंतर शरद पवारांनी याच विषयावर विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात या उद्देशाने आणि आयटी व्यावसायिक आणि क्रिप्टोग्राफर्स यांची मते जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

CCE च्या अहवालात काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या अहवालात माहिती तंत्रज्ञान विषयातील नामवंत प्राध्यापक, क्रिप्टोग्राफर्स आणि निवृत्त सरकारी अधिकारी यांची मते आहेत. सिव्हिल सोसायटीने मे २०२२ मध्ये निवडणूक आयोगाला एक पत्र सादर केले होते आणि त्यानंतर दोन आठवड्यांनंतर आणखी एक पत्र सादर केले होते. पण निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही. ईव्हीएममध्ये फेरफार होण्याच्या शक्यतेबाबत सर्वसामान्यांकडूनही शंका उपस्थित केली जात आहे. याची जाणीव निवडणूक आयोगाला करुन देण्यात आली होती. आता शरद पवारांचा (Sharad Pawar) याच प्रश्नी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.

हे ही वाचा :

Back to top button