विश्लेषण : शरद पवारांच्या नागालँड प्रयोगाने महाविकास आघाडीत अस्वस्थता | पुढारी

विश्लेषण : शरद पवारांच्या नागालँड प्रयोगाने महाविकास आघाडीत अस्वस्थता

  • विश्लेषण, सुरेश पवार

नागालँड विधानसभा निकालानंतर एनडीपीपी हा स्थानिक पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांचे संयुक्त सरकार सत्तेवर आले आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आले आहेत. महाराष्ट्रात विरोधी बाकावर बसणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये मात्र भाजप-एनडीपीपी या संयुक्त सरकारला पाठिंबा द्यायचे ठरवले आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही पक्षांत प्रचंड अस्वस्थता आहे.

वास्तविक नागालँडमध्ये भाजप-एन.डी.पी.पी. पक्ष पूर्ण बहुमताने सत्तेवर आला आहे. अन्य कोणत्याही पक्षाला दोन अंकी संख्या गाठता आली नाही. या सरकारला कोणाच्या पाठिंब्याची गरजही नाही, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हा पाठिंबा दिल्याविषयी उलटसुलट चर्चा होत आहे. ‘मान न मान, मैं तेरा मेहमान’ असा हा प्रकार असल्याची चर्चा आहे.

न पटणारा खुलासा

आपल्या या पाठिंब्याबाबत शरद पवारांनी केलेला खुलासा म्हणजे ताकाला जाताना भांडे लपवण्याचाच प्रकार आहे. आम्ही एनडीपीपीचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांना पाठिंबा दिला आहे, हा पवारांचा खुलासा म्हणजे मखलाशीचाच उद्योग असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 2014 मध्ये पवारांनी महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर भाजपला एकतर्फी पाठिंबा जाहीर केला होता, तेव्हा राज्यात अस्थैर्य येऊ नये, म्हणून आपण ही भूमिका घेतल्याचे समर्थन शरद पवार यांनी केले होते. तेव्हाही ते कोणाला फारसे पटलेले नव्हते आणि आताची त्यांची नागालँडबाबतची भूमिका विश्वास ठेवावी, अशी वाटत नसल्याचेही बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

पहाटेच्या शपथविधीमागचे काही रहस्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्तास गुलदस्त्यात ठेवले आहे; पण तेव्हाची राष्ट्रपती राजवट उठवावी, म्हणून पवारांनी ही खेळी केल्याचे मोठ्या कौतुकाने सांगितले जाते.

शरद पवार यांची भूमिका नेहमीच अनाकलनीय असते, असा अनुभव आहे. ते बोलतील एक आणि करतील दुसरेच, असा त्यांचा खाक्या असल्याचे सांगितले जाते. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात हा पवार पॅटर्न दिसून येतो. ऐनवेळी आपल्या मित्र पक्षाचा सोयीस्कर विश्वासघात केला गेल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आली आहेत. त्यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात मी कोणाला, केव्हाही ‘कात्रजचा घाट दाखवतो’ अशी स्षष्ट कबुलीच दिली आहे.

‘पुलोद’ प्रयोगावेळी पवारांनी तेव्हाच्या जनसंघाशी म्हणजे विद्यमान भाजपशी हातमिळवणी केलीच होती. आपल्या राजकारणाशी, कोणाशीही जुळवून घ्यायला त्यांची हरकत नसल्याची उदाहरणे आहेतच. वारा पाहून पाठ फिरवण्यात ते माहीर आहेत. त्यामुळे सध्या जरी महाविकास आघाडीत त्यांचा पक्ष सहभागी असला, तरी उद्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते
काय भूमिका घेतील, हे सांगणे कठीण आहे.

अनुकूल दान मिळाले, अपेक्षित गणित जुळले, तर ते कोणताही निर्णय घ्यायला मोकळेच आहेत. नागालँडमधील त्यांचा प्रयोग ही त्याची नांदी असू शकते. त्यामुळेच काँग्रेस आणि उद्धव यांच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली असली, तर आश्चर्य वाटण्याचे कारण
नाही.

Back to top button