World Water Day : येथे पाणी भरण्यासाठी केले जाते लग्न! शहापूरमधील ‘पाणीवाली बाई’ची व्यथा… | पुढारी

World Water Day : येथे पाणी भरण्यासाठी केले जाते लग्न! शहापूरमधील ‘पाणीवाली बाई’ची व्यथा...

डोंबिवली; भाग्यश्री प्रधान-आचार्य : ‘अगं ए बाय जा पानी भरायला. इथं घरात पान्याचा थेंब नाही आणि अंगणात काय खेळतेस… लगीन झाल्यावर पानीच भरायचंय’… असे एक मावशी आपल्या लहानग्या दहा वर्षाच्या मुलीला सांगत होती. आम्ही शहापूरजवळील एका पाड्यावर पोहोचताच माय-लेकींचा हा संवाद कानी पडला. चक्क ही दहा वर्षांची पोर डोक्यावर दोन हंडे आणि हातात दोन हंडे घेऊन दूर कोसावर पाणी भरायला निघाली. इतकेच नव्हे तर केवळ पाणी भरण्यासाठी कितीतरी जोडप्यांनी दोन लग्न केल्याचे आदिवासी पाड्यावर दिसून आले. संपूर्ण मुंबईला पाणी देणार्‍या शहापूर तालुक्यातील आदिवासी पाडे आजही तहानलेलेच आहेत. (World Water Day)

पाण्यासाठी आदिवासी महिलांची वणवण… (World Water Day)

धरण उशाला आणि कोरड घशाला अशी येथील परिस्थिती. आजूबाजूच्या परिसरात मध्य वैतरणा, तानसा, भातसा अशी मुंबईला पाणीपुरवठा करणारी मोठी आणि अनेक छोटी छोटी धरणे आहेत. मात्र शहापूर, कसारा या भागातील नागरिकांना कायमच पाण्याच्या शोधात वणवण करावी लागते. एक थेंब पाण्यासाठी देखील महिलांना मोठा संघर्ष करावा लागतो. पाण्यामुळे या भागातील आदिवासी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा सर्वच चक्रात गुंतून पडल्याचे त्यांच्याशी बोलताना लक्षात आले.

पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष

यावेळी येथील महिलांशी आणि त्या परिसरात काम करणार्‍या काही संस्थांशी ‘पुढारी’च्या टीमने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी यशोदा (नाव बदलले आहे) मावशींनी सांगितलं, “काय करणार गं बाये, तुमच्याकडे भरपूर पाणी आहे. आमच्याकडे पाण्याचा एक एक थेंब जमा करावा लागतो तेव्हा एक कळशी भरते. सगळ्यात जास्त पाण्याचा वापर महिलांनाच करावा लागतो ना. पुरुष मानस काय आंघोळ केली की चालले कामाला. आंघोळ, स्वयंपाक, कपडे, भांडी. शिवाय पिण्यासाठी पाणी तर लागतेच ना. त्यात आमच्याकडे गुरं आहेत. त्यांना का आम्ही पाण्यावाचून ठेवणार”, असा सवालही त्यांनी केला. (World Water Day)

सरपंच सभेत वारंवार मागणी

दुसर्‍या पार्वती मावशी (नाव बदलले आहे) म्हणाल्या, “कितीवेळा सरपंचाच्या सभेत आम्ही मागणी केली आहे. पण काही उपयोग होत नाही. सरपंचाच्या सभेत आम्ही महिला जास्त जात नाही ना. पण यावेळी मी ठरवलं आहे, सरपंचालाच जबाबदार धरायचे.” शीला आजी ( नाव बदललं आहे), “अगं बये, माझं आयुष्य सरलं पाणी भरण्यात. सकाळी लवकर उठायचं आणि हांडे डोक्यावर घेऊन कोसभर चालत जाऊन पाणी भरायचं. अशा दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन तरी फेर्‍या मारायच्या. म्हणजे दिवसभरात पुरेल इतके पाणी मिळते. थकून गेलं शरीर पाणी भरून”, असं सांगताना त्या गाहिवरल्या होत्या.

बोअरिंग हापसले तरी पाणी येत नाही

विठा आजी (नाव बदलले आहे). काही वर्षांपूर्वी इतकी परिस्थिती नव्हती, असे सांगताना आता बोअरिंगला हापसले तरी पाणी येत नाही, असे सांगताना सरकारी अधिकारी जमिनीत इंजेक्शन मारतात आणि त्यानंतर पाणी येत नसल्याचे त्यांचे निरीक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. धरण भरून वाहत आहेत; मग आम्हाला का पाण्यासाठी का वणवण करावी लागते गं? असा प्रश्न त्या विचारत होत्या. पाण्याच्या प्रश्नामुळे आमच्या समाजाच्या मुली शहापूर परिसरात लगीन करून यायला तयार होत नाहीत, असे मालाताईंनी सांगितले.

त्यांना का म्हटलं जातं ‘पाणीवाली बाई’

या संदर्भात डोंबिवलीतील ‘हेल्पिंग हँड’ या संस्थेशी संपर्क साधला असता या संस्थेची अध्यक्षा प्रियांका हिने आम्ही या गावात काम करत असल्याचे सांगत सगळ्या गोष्टींना दुजोरा दिला. ती ज्या पाड्यावर काम करते तो पाडा शहापूर येथे आहे. हे संपूर्ण चक्र असल्याचं सांगत धरणात पाणी साठावे यासाठी जमिनीत इंजेक्शन दिले जाते. यामुळे जमिनीत जो पाझर फुटतो तो थेट धरणाच्या पाणी क्षमतेत वाढ करत असल्याचे तिने सांगितले. अजूनही सावकारी पद्धत असून पहिली बायको थकली की कर्जातून मुक्ती मिळेल, असे सांगत कर्जदाराच्या मुलीला मागणी घातली जाते. लग्नात तिची कोणती हौस पुरवली जात नाही. या मुलीने केवळ पाणी भरण्याचे काम करतात म्हणून त्यांना पाणीवाली बाई म्हणून संबोधले जाते, असे देखील तिने नमूद केले.

तिशीतच महिला अनेक दुखण्यांनी त्रस्त

15 ते 16 या वयात होणारी लग्नं आणि त्यानंतर पाणी भरण्याची जबाबदारी येऊन ठेपली की तिसाव्या वर्षी मान, कंबर, पाठदुखी सुरू होते. त्यातच वर्षभराच्या अंतरात होणारी तीन ते चार मुलं या सगळ्यात आम्ही थकून जातो. मग आम्ही थकलो तर घरात पाणी कोण भरून आणेल आणि लहानग्यांना कोण सांभाळेल, अशी परिस्थिती होते गं. कोणालाही चार बायका करायची हौस नाही हो, असे पाड्यावरील वनिता (नाव बदलले आहे) सांगत होती.

अधिक वाचा :

Back to top button