मुंबई: धारावी येथे आगीत पार्किंगमधील ९ दुचाकीसह ८ खोल्या जळून खाक  | पुढारी

मुंबई: धारावी येथे आगीत पार्किंगमधील ९ दुचाकीसह ८ खोल्या जळून खाक 

धारावी: पुढारी वृत्तसेवा: पार्किंगमधील ९ दुचाकी पेटल्याने लगतच्या चार मजली इमारतीमधील ८ खोल्या जळून खाक झाल्या. ही घटना धारावी कोळीवाड्यातील महात्मा गांधी हौसिंग सोसायटीत आज (दि.२०) पहाटे घडली. याप्रकरणी अज्ञातां विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सायन बांद्रा लिंक रोडला लागून असलेल्या महात्मा गांधी सोसायटी बिल्डिंग नं. ६ मधील रहिवाशांना आज पहाटे अडीचच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्याने जाग आली. यावेळी घरातील साहित्यांनी पेट घेतल्याचे दिसताच त्यांनी घराबाहेर धाव घेत आरडाओरड सुरु केली. तळमजल्यापासून चौथ्या मजल्यापर्यंत प्रत्येक मजल्यावरील दोन घरात आग लागली होती. तर संपूर्ण इमारतीमध्ये धुराचे साम्राज्य पसरले होते.

प्रसंगावधान राखत इमारतीमधील सर्व रहिवाशांनी इमारतीबाहेर पळ काढला. दरम्यान, इमारतीला लागून असलेल्या पार्किंगमधील ९ दुचाकींनी पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ अग्निशमन दल आणि धारावी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पाण्याचा मारा करत आग विझविण्याचा प्रयत्न करताच दुचाकींच्या पेट्रोल टाक्यांनी पेट घेतला. इमारतीमध्ये धुराचे मोठे लोट निघू लागले होते. रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचा पुढील तपास धारावी पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button