मुंबई : धारावीत मालाने भरलेल्या गोण्या अंगावर पडून एकाचा मृत्यू  | पुढारी

मुंबई : धारावीत मालाने भरलेल्या गोण्या अंगावर पडून एकाचा मृत्यू 

धारावी : पुढारी वृत्तसेवा : धारावी सायन द्रुतगती मार्गावरील पिवळा बंगला परिसरात साई कृपा लाईम डेपोत काम करणाऱ्या हमालाचा मालाने भरलेल्या गोण्या अंगावर पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (दि. १६) पहाटे घडलेल्या या घटनेत बबलू केवट (वय ३६) असे मृत्यू झालेल्या हमालाचे नाव आहे. याप्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास धारावी पोलिसांची गस्त सुरु होती. याच दरम्यान साई कृपा लाईम डेपो मधून एक अज्ञात इसम बचाव बचाव असा आवाज पोलिसांना आला. तात्काळ पोलिसांनी त्या बंद शटरकडे धाव घेत थांबून पाहिले असता सदर दुकानाचे बंद शटर आतून कोणीतरी ठोकत असल्याचे लक्षात आले. याची खात्री होताच पोलिसांनी जवळच उभ्या असलेल्या जेसीबी चालकाची मदत घेऊन दुकानाचे शटर उघडले. आतील भयावह दृश्य पाहून पोलिसांनी तात्काळ स्थानिकांच्या मदतीने मालाच्या गोण्याखाली अडकलेल्या आतील दोन इसमांना बाहेर काढले. यातील एक पुरुष बेशुद्ध अवस्थेत असल्याचे पाहून पोलिसांनी त्याला त्याच्या साथीदारांसह उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी बेशुद्ध असलेल्या केवट यांना मयत घोषित केले. याबाबत पोलिसांनी या दुर्घटनेत सहीसलामत बचावलेल्या मैन तुरहा यांचा जबाब नोंद केला.

साई कृपा लाईम डेपोत हमालाचे काम करणारे बबलू आणि मैन तुरहा बुधवारी (दि. १५) रात्री आपले जेवण आटोपून दुकानात गाढ झोपले होते. पहाटे ४ च्या सुमारास थप्पी लावलेल्या मालाच्या गोण्या अचानक अंगावर कोसळल्याने बबलू यांचा मृत्यू झाल्याचे तुरहा यांनी सांगितले.

Back to top button