मुंबई : शहा दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले | पुढारी

मुंबई : शहा दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले

घाटकोपर; पुढारी वृत्तसेवा : घाटकोपर येथील शहा दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ आता आणखी वाढले आहे. ८ रोजी पंतनगर येथील कुकरेजा पॅलेस या उच्चभ्रू इमारतीमध्ये दीपक शांतीलाल शहा आणि टीना शहा या दाम्पत्याचा मृतदेह घराच्या बाथरूम मध्ये आढळला होता. मात्र, त्यांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला? याबाबत खुलासा झालेला नाही. ९ मार्चरोजी राजावाडी रुग्णालयात दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

दरम्यान, दोन्ही मृतदेहांवर कोणत्याही माराच्या खुणा अथवा जखमा नव्हत्या. त्यांचे व्हिसेरा, रक्त आणि स्टमक वॉश वैद्यकीय तपासणीसाठी कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. व्हिसेरा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता या दाम्पत्याच्या मृत्यूबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी दीपक यांचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. दीपक हे कपडा व्यापारी असून भिवंडीला त्यांचा कारखाना आहे. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुली आहेत. मात्र, दीपकचा खूप चिडचिडा स्वभाव आणि होणारी भांडणे यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तीन महिन्यांनी टीना आणि दीपक यांनी लग्न केले होते. ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा ते होळी खेळून घरी आले होते. पुन्हा ते काही काळ बाहेर गेले होते. मात्र, ते कोणाकडे गेले, तिकडे काय झाले? याबाबत आता पोलीस तपास सुरू आहे. इमारतीचे सुरक्षा रक्षक, नातेवाईक, तांत्रिक तपास या सर्वातून वेगवेगळी पथके तयार करून पंतनगर पोलीस तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी दिली.

मात्र, या दाम्पत्याच्या गूढ मृत्यूमुळे पंतनगर विभागात चर्चेला उधाण आले आहे. ९ मार्चरोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय? हा अपघात, की घातपात की आणखी काही ? असा सवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त होणार नाही, तोपर्यंत अनुत्तरित राहणार आहे.

हेही वाचा 

Back to top button