बारावी पेपर फुटीप्रकरणी प्राचार्यासह पाच अटकेत! मुंबई पोलिसांची नगरमध्ये कारवाई | पुढारी

बारावी पेपर फुटीप्रकरणी प्राचार्यासह पाच अटकेत! मुंबई पोलिसांची नगरमध्ये कारवाई

नगर; पुढारी वृत्तसेवा : बारावी गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखाने नगरमधून पाच जणांना ताब्यात घेत अटक केली आहे. यात रूईछत्तीसी येथील भामरे कॉलेजच्या प्राचार्यासह एक शिक्षक, एक पीटी शिक्षक, एक कर्मचारी आणि चालकाचा समावेश आहे. दादरमधील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील परीक्षा केंद्रात गेल्या शनिवारी एका विद्यार्थ्याजवळ मोबाईल सापडला होता. मोबाईलमध्ये बारावी गणिताच्या प्रश्नपत्रिकेचा काही भाग होता.

परीक्षा सुरू होण्याआधी 10 वाजून 17 मिनिटांनी हा पेपर विद्यार्थ्याच्या मोबाईलवर आल्याचे दिसून आले. डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात 3 परीक्षार्थी व एक शिक्षक अशा एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पथकाने नगरमधून 17 वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले.

आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. या विद्यार्थ्याकडे केलेली चौकशी आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे मुंबई पोलिसांना नगरची लिंक लागली. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस नगरमध्ये पोहचले. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मदतीने मुबंई पोलिसांनी रूईछत्तीसी येथील भामरे कॉलेजशी संबंधित पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात प्राचार्याचाही समावेश आहे.

नगर, श्रीगोंदा, कर्जतमधील शिक्षकांचा सहभाग
किरण संदीप दिघे (वय 28, शिक्षिका, रा. बालिकाश्रम रोड, नगर), अर्चना बाळासाहेब भामरे (वय 23, स्कूल मॅनेजमेंट, भामरे कॉलेज, रा. रूईछत्तीसी, नगर), भाऊसाहेब लोभाजी अमृते (वय 54, प्राचार्य, वाटेफळ, नगर), वैभव संजय तरटे (वय 21, चालक, घोगरगाव, ता. श्रीगोंदा), सचिन दत्तात्रय महारनवर (वय 23, पीटी शिक्षक, थेरगाव, कर्जत).

नगरमधून प्रश्नपत्रिका पोहचली मुंबईत
बारावी प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल केला जात होता. प्रत्येकी दहा हजार रुपयांना प्रश्नपत्रिका संबंधितांना शिक्षकांकडून पाठविली जात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास सुरू आहे. मुंबईत विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये आढळलेला गणिताच्या प्रश्नपत्रिकेचा काही भाग हा नगरमधूनच गेल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Back to top button