११ वर्षांच्‍या मुलाचा वडिलांसोबत जाण्‍यास नकार, मुंबई उच्‍च न्‍यायालयाने अनुभवला ‘फिल्‍मी स्‍टाईल ड्रामा’ | पुढारी

११ वर्षांच्‍या मुलाचा वडिलांसोबत जाण्‍यास नकार, मुंबई उच्‍च न्‍यायालयाने अनुभवला 'फिल्‍मी स्‍टाईल ड्रामा'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ११ वर्षांच्‍या मुलाला वडिलांच्‍या ताब्‍यात देण्‍याचा आदेश उच्‍च न्‍यायालयाच्‍या खंडपीठाने दिला… वडिलांनी मुलाला ताब्‍यात घेत त्‍याला कारमध्‍ये बसवण्‍याचा प्रयत्‍न केला… मुलाने वडिलांच्‍या तावडीतून सुटका करुन घेत पुन्‍हा उच्‍च न्‍यायालयाच्‍या इमारतीत धाव घेतली… मुलाचे मामा आणि वडिलांमध्‍ये भांडण झाले… न्‍यायालयाच्‍या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला. हा फिल्‍मी स्‍टाईल ड्रामा मुंबई उच्‍च न्‍यायालयाने मंगळवारी अनुभवला. ( Dramatic scenes in Bombay High Court )

नेमकं प्रकरण काय?

मुलाच्‍या आईचे तीन वर्षांपूर्वी कर्करोगाने ( कॅन्‍सर ) निधन झाले होते. तेव्‍हा मुलगा आठ वर्षांचा होता. तो आपल्‍या मामा आणि आजी-आजोबांसोबत राहत होता. वडिलांना मुलाचा ताबा मिळावा म्‍हणून उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली. उच्‍च न्‍यायालयाने फेब्रुवारी २०२२ मध्‍ये मुलाचा ताबा वडिलांकडे देण्‍याचा आदेश मुलाच्‍या आईच्‍या नातेवाईकांना दिला होता. या विरोधात मुलाचा मामा आणि आजी-आजोबांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली. सप्‍टेंबर २०२२ मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयानेही उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय कायम ठेवत मुलाचा ताबा वडिलांकडे देण्‍याचा आदेश दिला. मात्र यानंतरही या आदेशाचे पालन झाले नाही. यानंतर मुलाच्‍या वडिलांनी न्‍यायालयाच्‍या आदेशाचा अवमान झाल्‍याची याचिका दाखल केली होती. याची गंभीर दखल घेत उच्‍च न्‍यायालयाने तत्‍काळ मुलाचा ताबा वडिलांना द्यावा, असा आदेश न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्‍यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्‍या खंडपीठाने दिला.

Dramatic scenes in Bombay High Court : उच्‍च न्‍यायालयात काय घडलं ?

उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशानुसार वडिलांनी मुलाला ताब्‍यात घेतले. या वेळी न्‍यायालयाच्‍या आवाराबाहेर मुलाच्‍या आईकडील नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. वडिलांनी मुलाला कारमध्‍ये बसवण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र मुलाने यास नकार दिला. वडिलांच्‍या तावडीतून सुटका करुन घेत त्याने थेट उच्‍च न्‍यायालयाच्‍या इमारतीत धाव घेतली. मुलाने उच्‍च न्‍यायालयाच्‍या इमारतीत धाव घेतल्‍याने एकच गोंधळ उडला. मुलाचे वडील आणि आजी-आजोबा यांच्‍यात भांडण झाले. मुलाच्‍या मामा आणि वडिलांची शाब्‍दिक चकमकही झाली. यामुळे न्यायालयाच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला.

न्‍यायालयाने फटकारले

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल उच्‍च न्‍यायालयाच्‍या खंडपीठाने घेतली. न्‍यायालयाने मुलाच्‍या आईच्‍या नातेवाईकांची बाजू मांडणार्‍या वकिलांना फटकारले. या वेळी मुलाचे आजोबा आणि मामा तसेव वकिलांनी मुलगा वडिलांच्‍या तावडीतून सुटका करुन घेतानाचा व्‍हिडिओ पाहण्‍याची विनंती केली. खंडपीठाने हा व्‍हिडिओ पाहण्‍यास नकार दिला. मागील सुनावणीपासून आम्‍ही तुमच्‍या वागणुकीचे निरीक्षण करत आहोत. तुम्‍ही या प्रकरणी सर्वच बाबींचा अतिरेक करत आहोत, असे फटकारत न्‍यायालयाच्‍या आदेशाचे पालन करण्याचा आदेश दिला. यामध्‍ये हस्‍तक्षेप केल्‍यास कठोर कारवाईचा इशाराही खंडपीठाने या वेळी दिला. तसेच मुलाला सायंकाळी ७ वाजेपर्यंत कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात मामाच्या नातेवाईकांनी वडिलांच्या ताब्यात द्यावे, असा आदेश दिला.

हेही वाचा : 

 

 

Back to top button