COVID-19 | चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच जगभर कोरोना पसरला, अमेरिकेची तपास यंत्रणा FBI ने केली पुष्टी | पुढारी

COVID-19 | चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच जगभर कोरोना पसरला, अमेरिकेची तपास यंत्रणा FBI ने केली पुष्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच जगभर कोरोना महामारीचा फैलाव झाला, अशी पुष्टी अमेरिकेची तपास यंत्रणा ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स’चे (एफबीआय) संचालक ख्रिस्तोफर व्रे यांनी केली आहे. याबाबतचे ट्विट FBI ने केले आहे. कोविड -१९ (COVID-19) महामारी चीन सरकारच्या प्रयोगशाळेमुळेच उद्भवली, असेही त्यांनी म्हटले आहे. “एफबीआयने असे मूल्यांकन केले आहे की कोरोना साथीच्या रोगाची उत्पत्ती प्रयोगशाळेतूनच झाली असण्याची अधिक शक्यता आहे,” असे ख्रिस्तोफर व्रे यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली याबाबत एफबीआयने केलेली ही पहिली सार्वजनिक पुष्टी आहे.

दरम्यान, चीनने वुहानमधील प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा फैलाव झाल्याच्या दावा फेटाळून लावला आहे आणि हा आरोप मानहानीकारक असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनमधील अमेरिकेच्या राजदूताने कोरोनाची उत्पत्ती नेमकी कुठे झाली याबाबत प्रामणिक राहण्याचे आवाहन केल्यानंतर व्रे यांनी हा मोठा दावा केला आहे.

चीनच्या वुहानमधून कोरोना विषाणूचे प्राण्यांतून मानवामध्ये संक्रमण झाल्याचे काही अभ्यास अहवालात म्हटले आहे. विशेषतः वुहानमधील सी- फूड आणि वन्यजीव बाजारपेठेतून कोरोना विषाणू बाहेर पडून जगभर पसरला असल्याची शक्यता याआधी व्यक्त करण्यात आली होती. कोरोना विषाणूवर संशोधन करणार्‍या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या जगातील आघाडीच्या प्रयोगशाळेपासून या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी केवळ ४० मिनिटे लागतात.

डिसेंबर २०१९ मध्ये कोरोनाचा फैलाव झाला आणि त्यावेळेपासून अद्याप जग या विषाणूचा सामना करीत आहे. हा विषाणू नेमका कुठून फैलावला याबाबत उलटसुलट दावे करण्यात आले आणि त्याबाबत याआधी ठोस माहिती समोर आलेली नव्हती. चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच (Wuhan Laboratory China) हा विषाणू ‘लीक’ झाला व त्याचा फैलाव होत गेला असे म्हटले जाते. आता या दाव्याची अमेरिकेने पुष्टी केली आहे.

कोरोना (COVID-19) महामारीच्या सुरुवातीपासूनच वुहान प्रयोगशाळेकडे संशयाने पाहिले जात आहे. या प्रयोगशाळेतून कोरोना लीक होण्याबाबतचे अनेक थेअरी समोर आल्या आहेत. या प्रयोगशाळेत काम करणारे संशोधक विशेषतः कोरोना विषाणू व त्याच्या विविध व्हेरिएंटस्वर संशोधन करतात. त्यामुळे एखाद्या संशोधकाकडूनच या विषाणूचे संक्रमण फैलावले गेले असल्याची शंका अनेकांना वाटते. मात्र, चिनी सरकार आणि वुहान प्रयोगशाळेने हे आरोप सातत्याने फेटाळले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button