Share Market Closing : कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात बुधवारी (दि.२२) घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ५०० अंकांनी घसरला. तर निफ्टी १७,७०० च्या खाली आला. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स ९०० हून अधिक अंकांनी (Sensex crash) घसरला होता. तर निफ्टी १७,६०० च्या खाली आला होता. त्यानंतर सेन्सेक्स ९२७ अंकांनी घसरून ५९,७४४ वर बंद झाला. तर निफ्टी २७२ अंकांनी घसरून १७,५५४ पर्यंत खाली आला. आजच्या व्यवहारात १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी १२ घसरले. फायनान्सियल स्टॉक्स ०.७५ टक्के घसरले. आयटी स्टॉक्स सुमारे १ टक्क्याने खाली आले. तर मेटल स्टॉक्स ३ टक्क्यांपर्यंत घसरले.
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात आजच्या सत्रात झालेली घसरण ही सलग चौथी आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे गेल्या चार दिवसांत ७ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. आजच्या सत्रात बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३.८ लाख कोटींनी कमी होऊन २६१.४ लाख कोटींपर्यंत खाली आले आहे. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्सने सुमारे १,५०० अंक गमावले आहेत. आज सेन्सेक्सवर विप्रो, इंडसइंड बँक आणि अल्ट्राटेक हे शेअर्स सुमारे १ टक्क्याने घसरले. एल अँड टी, सन फार्मा आणि मारुती या शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली.
अदानी समूहाच्या सर्व १० शेअर्सवर विक्रीचा दबाव कायम राहिला आहे. निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर टॉप लूजर होता. हा शेअर सुमारे ८ टक्क्यांने गडगडला. आजच्या सत्रात अदानी समूहाच्या बाजार भांडवलाचे ४० हजार कोटी नुकसान झाले आहे. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर, अदानी ग्रीन हे शेअर्स ५ टक्के लोअर सर्किटमध्ये गेले आहेत. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर आतापर्यंत अदानी समूहाच्या १० शेअर्सनी ११.५ लाख कोटी बाजार भांडवल गमावले आहे.
PSU बॅकिंग क्षेत्रातील शेअर्सही आज घसरले. यात इंडियन बँक (-३.२४ टक्के), युनियन बँक इंडिया (-३.०२ टक्के), पंजाब नॅशनल बँक (-२.३४ टक्के), इंडियन ओव्हरसीज बँक (-२.२२ टक्के), कॅनरा बँक (-१.८३ टक्के), बँक ऑफ बडोदा (-१.७८ टक्के), कॅनरा बँक ऑफ इंडिया (-१.७३ टक्के) यांचा समावेश होता.
अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढ कायम ठेवणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार धास्तावले आहे. यामुळे अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली आहे. मंगळवारचा दिवस हा २०२३ मधील अमेरिकेच्या शेअर बाजारातील सर्वात वाईट दिवस ठरला. एस अँड पी ५०० निर्देशांक २ टक्क्यांनी घसरला. तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज निर्देशांक ६९७ अंकांनी खाली आला. तर नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक २.५ टक्क्यांने घसरला. आशियाई बाजारातही हीच स्थिती राहिली. जपानचा निक्केई निर्देशांक १.३४ टक्क्याने घसरून एक महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर बंद झाला.
बाजारातील गुंतवणूकदारांना आता फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. यामुळे बुधवारी तेलाच्या किमती घसरल्या. तर सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ३ पैशांनी घसरून ८२.८२ वर आला. (Share Market Closing)
हे ही वाचा :