EPFO : ’ईपीएफओ’मध्ये ई-नॉमिनेशन हिताचे | पुढारी

EPFO : ’ईपीएफओ’मध्ये ई-नॉमिनेशन हिताचे

EPFO : ईपीएफओ खातेधारकांसाठी अनेक ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यानुसार ई-नॉमिनेशनच्या माध्यमातून खात्यात नॉमिनी/वारसाचे नाव नोंदवता येतेे. ईपीएफ खात्याला नॉमिनीचे नाव जोडणे महत्त्वाचे असून त्याचा लाभ कायदेशीर वारसदार, नॉमिनीला मिळतो. ईपीएफओ खातेधारकाचा अकाली मृत्यू झाला तर सहजपणे ऑनलाईन क्लेम सेटलमेंट होतो.

सरकारच्या ईपीएफओ व्यवस्थेमुळे देशातील लाखो नोकरदार वर्गांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळाला आहे. ईपीएफओ खातेधारकांना केवळ पेन्शनचीच सुविधा मिळत नाही, तर त्यांच्या खात्यात जमा होणार्‍या रकमेवर बँकेच्या तुलनेत सर्वाधिक व्याज मिळते. ईपीएफओ खातेधारकांना सध्या 8.1 टक्के व्याज मिळत असून हे व्याजदर अन्य कोणत्याही बँकेच्या ठेवीवर मिळणार्‍या व्याजाच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या काही वर्षांत व्यवहाराचे डिजिटायझेशन वेगाने होत असताना सरकारने ईपीएफ खातेधारकांनाही ऑनलाईन सुविधा दिली. परिणामी ईपीएफओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहिली नाही.

EPFO : ई-नॉमिनेशनच्या माध्यमातून नॉमिनीला जोडा

पूर्वी ईपीएफओ खात्याला नॉमिनी जोडण्यासाठी नोकरदारांना कार्यालयात चकरा माराव्या लागत असत. मात्र आता ई-नॉमिनेशनच्या वैशिष्ट्यामुळे कोठूनही आणि कधीही ईपीएफ खात्याला नॉमिनी जोडता येणे शक्य आहे. अर्थात, अनेकांना ई-नॉमिनेशनचे फायदे ठाऊक नाहीत. ई-नॉमिनेशनच्या सुविधेतून कोणत्याही व्यक्तीला नॉमिनी करू शकता. भविष्यातील आर्थिक क्लिष्टता टाळण्यासाठी आपल्या कोणत्याही खात्याला नॉमिनी असणे गरजेचे आहे.

EPFO : ई-नॉमिनेशनचे फायदे

ईपीएफओ खातेधारक हा ई-नॉमिनेशनच्या सुविधेमुळे सहजपणे आपल्या खात्याला नॉमिनी जोडू शकतो. ईपीएफओ खात्याला नॉमिनीचे नाव असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण एखाद्या खातेदाराचा अकाली मृत्यू झाला, तर अशा वेळी कायदेशीर वारसास ऑनलाईन क्लेम सेटलमेंट करणे सोपे जाते. याशिवाय खातेधारकाने नेमलेला नॉमिनी पात्र असेल तर पीएफ, पेन्शन आणि विम्याचे (सात लाख रुपये) पैसे सहजपणे त्याच्या खात्यात जमा होतात. ई-नॉमिनेशनमुळे हे सर्व काम ऑनलाईन आणि वेगात होते.

Back to top button