Stock Market Closing | शेअर बाजार स्थिर! PSU बँक स्टॉक्सवर दबाव, अदानींच्या ३ शेअर्सला लोअर सर्किट

Stock Market Closing | शेअर बाजार स्थिर! PSU बँक स्टॉक्सवर दबाव, अदानींच्या ३ शेअर्सला लोअर सर्किट

Stock Market Closing : बाजारातील गुंतवणूकदारांचे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी (दि.२१) आशियाई बाजारात घसरण पहायला मिळाली. तर भारतीय शेअर बाजारात स्थिर पातळीवर व्यवहार दिसून आला. शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १५० अंकांनी वाढून ६०,८०० वर होता. तर निफ्टी १८ हजारांखाली होता. PSU बँक, रियल्टी निर्देशांक सुमारे १ टक्क्याने खाली आला. दुपारी १ च्या सुमारास दोन्ही निर्देशांकांनी तेजी गमावली आणि त्यांनी स्थिर पातळीवर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स १८ अंकांनी खाली येऊन ६०,६७२ वर बंद झाला. तर निफ्टी १७ अंकांनी घसरून १७,८२६ वर स्थिरावला.

आजच्या व्यवहारात अदानी पॉवर, एनटीपीसी, टाटा पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी, पॉवर ग्रीड हे शेअर्स आज आघाडीवर राहिले. येस बँक (०.३० टक्के), अदानी पॉवर (४.९७ टक्के), पंजाब नॅशनल बँक (०.४० टक्के), टाटा स्टील (१.१६ टक्के), भारत इलेक्ट्रॉनिक्स (०.२१ टक्के), एनटीपीसी (१.७३ टक्के), अंबुजा सिमेंट (०.७७ टक्के) हे शेअर्स वधारले होते.

दरम्यान, विप्रो (-०.५८ टक्के), टेक महिंद्रा (-०.४३ टक्के), इन्फोसिस (-०.३१ टक्के) या आयटी स्टॉक्समध्ये किरकोळ घसरण झाली. व्होडाफोन आयडिया, टाटा कम्युनिकेशन्स, भारती एअरटेल, इंडस टॉवर्स हे टेलिकॉम पॅकमधील टॉप लूजर्स होते.

PSU बँकेचे स्टॉक्स ३ टक्क्यांपर्यंत घसरले

तसेच PSU बँकेचे स्टॉक्स सुमारे ३ टक्क्यांपर्यंत घसरले. यात बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यांचा समावेश होता.

FPIs कडून विक्रीचा जोर झाला कमी

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या (NSDL) आकडेवारीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून (FPIs) भारतीय शेअर्सची विक्री कमी झाल्याचे दिसून आले. FPIs ने फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ४८.०६ अब्ज रुपये (५८०.८६ दशलक्ष डॉलर) किमतीचे शेअर्स विकले. अमेरिकेच्या शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर्समधील एफपीआयची विक्री जानेवारीमध्ये सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली होती. FPIs ने जानेवारीत २८८.५२ अब्ज रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

अदानींच्या बाजार भांडवलात ५७ टक्क्यांची घट

एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात सुमारे ५७ टक्क्यांची घट झाली आहे. अदानीच्या शेअर्सवरील विक्रीचा दबाव आता किचिंत कमी झाला आहे. नॉन-स्टॉप विक्रीमुळे सर्व १० अदानी शेअर्सचे एकत्रित बाजार भांडवल आज ८.२ लाख कोटी रुपयांवर आले. जे २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग अहवाल समोर येण्याच्या एक दिवस आधी १९.२ लाख कोटी रुपये होते. यामुळे अदानींच्या बाजार भांडवलाचे एकूण नुकसान ११ लाख कोटी रुपये एवढे आहे.

अदानींचे ३ शेअर्स ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये

दिवसभरात अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅस हे तीन अदानींचे शेअर्स ५ टक्क्यांच्या लोअर सर्किट अडकले होते. दुसरीकडे अदानी पॉवरने ५ टक्क्यांने वाढून व्यवहार केला. ACC आणि अंबुजा सिमेंट शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्च पातळीपासून ६१ टक्क्यांनी घसरले आहेत तर अदानी पोर्ट्सला त्याच्या उच्चांकावरून ४० टक्क्यांनी घसरला आहे. (Stock Market Closing)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news