Traffic Police : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर नेले फरफटत अंधेरीमधील प्रकार - पुढारी

Traffic Police : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर नेले फरफटत अंधेरीमधील प्रकार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अंधेरी येथील डीए.एन. नगर परिसरात कार चालकाने एका वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन (Traffic Police) फरफटत नेल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. नो एंट्रीत घुसणाऱ्या कारला थांबवत असल्याने वाहतूक पोलीस विजय गुरव यांना कार चालकाने फरफटत नेऊन नंतर पोबारा केल्याची माहिती आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी जुहू गल्ली येथे कारचा शोध घेत गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस विजय गुरव (Traffic Police) हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्थानकाखालील जे. पी. मार्गावर तैनात होते. त्यावेळी एमएच-०२ डीक्यू १३१४ क्रमांकाची काळ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार नो एंट्रीत शिरली.

कार नो एंट्रीत आल्याचे पाहून गुरव यांनी ही कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने कार थांबवली नाही. नो एंट्रीमध्ये घुसणाऱ्या कार चालकाने गाडी न थांबविल्याने गुरव यांनी गाडीच्या बोनेटवर उडी घेतली. त्यानंतर कार चालकाने न खांबवता त्यांना आझाद मैदान येथून गणेश चौकापर्यंत फरफटत नेले.

बोनेटवरून खाली उतरवताच कार चालकाने पुन्हा पळ

काही अंतरावर गेल्यानंतर गणेश चौकात उभ्या असलेल्या सजग नागरिकांंनी हा प्रकार पाहिला, तसेच कार चालकाला गाडी थांबवण्यास भाग पाडले. वाहतूक पोलिसाला बोनेटवरून खाली उतरवताच कार चालकाने पुन्हा पळ काढला.

मात्र पुढे रस्ताच नसल्याचे पाहून कार चालकाने यू-टर्न घेत स्थानिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भीतीपोटी नागरिकांनी जागा करून देताच कार चालकाने तेथून पोबारा केला.

या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी त्या कारचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळाने ही कार जुहू गल्ली येथे आढळली. तेथूनच पोलिसांनी कार आणि कारचालकाला ताब्यात घेतले. पोलिसाला फरफटत नेणाऱ्या या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button