Mumbai Power Project: मुंबईकरांना अखंड वीजपुरवठा: मुंबई ऊर्जा प्रकल्पाला पीएम मोदींचा हिरवा कंदील

Mumbai Power Project: मुंबईकरांना अखंड वीजपुरवठा: मुंबई ऊर्जा प्रकल्पाला पीएम मोदींचा हिरवा कंदील

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : वाढते औद्योगीकरण आणि लोकसंख्येमुळे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढली आहे. यासाठी अखंड वीज उपलब्ध करणे ही काळाची गरज बनली आहे. सध्या देशभरात नॅशनल पॉवर ग्रीडच्या अंतर्गत काही प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक म्हणजे मुंबई ऊर्जा प्रकल्प (Mumbai Power Project). या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून लवकरच मुंबईकरांना अखंड वीजपुरवठा होणार असल्याची चर्चा आहे. सध्या या प्रकल्पाचे काम अंबरनाथ ग्रामीण, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली ग्रामीण येथील काही भागात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या मुंबई ऊर्जा (Mumbai Power Project) मार्ग प्रकल्पाच्या माध्यमातून अखंड वीज पुरवठ्यासाठी एक आंतरराज्य ट्रान्समिशन नेटवर्कची (ISTS) उभारणी केली जात आहे. ज्यामुळे मुंबई आणि एमएमआर रिजनसाठी तब्बल २ हजार मेगावॉट अतिरिक्त वीज पुरवठा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासोबतच या भागासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वीज पुरवठ्याच्या ट्रान्समिशन नेटवर्कलाही बळ देण्याचे काम या महत्वाकांक्षी प्रकल्पातून केले जाणार आहे.

मुंबई ऊर्जा मार्ग हा एक आंतर-राज्य पारेषण प्रणाली प्रकल्प आहे. ज्यामध्ये पश्चिम क्षेत्र बळकटीकरण योजना-XIX (WRSS-XIX) आणि उत्तर-पूर्व क्षेत्र बळकटीकरण योजना-IX (NERSS-IX) संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, आसाम आणि अरुणाचल प्रदेशचा समावेश आहे. तर मुंबई ऊर्जा मार्ग पारेषण प्रकल्पांतर्गत मुंबई आणि एमएमआरमध्ये 100 किमी ट्रान्समिशन लाइन्सचे जाळे विणले जाणार आहे. ज्यामध्ये मुंबई आणि एमएमआरसाठी 2 हजार मेगावॅटहून अधिक अतिरिक्त वीज वाहून नेण्याची क्षमता असेल.

कल्याण डोंबिवलीतील या गावातून जाणार हा प्रकल्प

पोई, अडिवली, बापसई, चवरे, दानबाव फळेगाव, म्हसकळ, नडगाव, नवागाव आणि वाळकस या गावातून वीज वाहिन्या जाणार आहेत.

Mumbai Power Project : काय आहे मुंबई ऊर्जा प्रकल्पाचे महत्त्व

मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन प्रकल्प मुंबईसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण जीवनरेखा विकसित करणारा आहे. सद्यस्थितीत, मुंबई महानगर प्रदेशाची सर्वाधिक विजेची मागणी सुमारे ४५०० मेगावॅट आहे. मात्र, या मागणीपैकी मुंबईत निर्माण होणाऱ्या १८७७ मेगावॅट विजेद्वारे ही गरज पूर्ण केली जाते, तर उर्वरित वीज मुंबईबाहेरून सध्याच्या ट्रान्समिशन नेटवर्कद्वारे आणली जाते. मात्र, कोणत्याही ट्रान्समिशन लाईनच्या आउटेजच्या बाबतीत (दोष किंवा देखभालीमुळे) प्रणाली ही गंभीर अवस्थेत काम करते. यामुळे कोणत्याही क्षणी ट्रिपिंगमुळे मुंबईतील लाईन किंवा अंतर्गत जनरेशन) लोडशेडिंग होऊ शकते. यापेक्षाही ट्रिपिंग किंवा ओव्हरलोडमुळे ब्लॅकआउटची परिस्थिती उद्भवू शकते. मात्र नवीन वाहिन्यांमुळे येणाऱ्या काळात मुंबईला अखंड वीज पुरवठा होणार आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news