

पुढारी ऑनलाईन डेस्क : WPL 2023 : क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर असून स्पर्धेचा पहिला हंगाम 4 मार्चपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना 26 मार्चला खेळवला जाणार आहे. या लीगच्या पहिल्या सत्रात एकूण 5 संघ खेळणार आहेत. याशिवाय पहिल्या सत्रातील सर्व सामने मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पटेल स्टेडियमवर खेळवले जातील.
डब्ल्यूपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाल्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लीगमधील लिलावासाठी सुमारे 1500 खेळाडूंनी नोंदणी केली आहे आणि अंतिम यादी या आठवड्याच्या शेवटी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात प्रत्येक संघाकडे 12 कोटी रुपये असतील. त्यांना किमान 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू खरेदी करावे लागतील.
महिला प्रीमियर लीगमध्ये, प्रत्येक संघाला एका सामन्यादरम्यान प्लेइंग इलेव्हनमध्ये सहयोगी सदस्य देशाच्या एका खेळाडूसह एकूण पाच परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवण्याची परवानगी असेल. उद्घाटन हंगामात एकूण 22 सामने खेळले जातील ज्यामध्ये लीग टप्प्यातील अव्वल संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. दुस-या आणि तिस-या क्रमांकाचे संघ विजेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा करतील.
डब्ल्यूपीएलच्या (WPL 2023) पहिल्या हंगामात एकूण पाच संघ सहभागी होणार आहेत. या पाच संघांपैकी तीन फ्रँचायझी आयपीएल संघ मालक मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी विकत घेतल्या आहेत. उर्वरित दोन संघ कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज (लखनौ) आणि अदानी स्पोर्ट्सलाइनने विकत घेतले आहेत.
महिला प्रीमियर लीगच्या पाच संघांच्या लिलावात एकूण 4669.99 कोटी रुपये मिळाले आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेचे मीडिया हक्क 951 कोटी रुपयांना विकले आहेत. अशा प्रकारे डब्ल्यूपीएल ही आयपीएल नंतर जगातील दुसरी सर्वात मोठी लीग बनली आहे.