Stock Market Updates | दोन सत्रांतील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स ३१९ अंकांनी वाढून ६०,९४१ वर बंद | पुढारी

Stock Market Updates | दोन सत्रांतील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स ३१९ अंकांनी वाढून ६०,९४१ वर बंद

Stock Market Updates : जागतिक सकारात्मक संकेतांच्या जोरावर आज सोमवारी (दि. २३) भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने उसळी घेत व्यवहार केला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४६२ अंकांनी वाढून ६१ हजारांवर पोहोचला तर निफ्टी १८,१०० वर गेला. त्यानंतर दिवसभर ही तेजी कायम राहिली. सेन्सेक्स ३१९ अंकांनी वाढून ६०,९४१ वर बंद झाला. तर निफ्टी ९० अंकांनी वाढून १८,११८ वर स्थिरावला. मागील दोन सत्रात शेअर बाजारात घसरण झाली होती. त्यानंतर आज या घसरणीला ब्रेक लागला.

आजच्या व्यवहारात आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्स सर्वाधिक अॅक्टिव्ह राहिले. काही बँकांनी तिमाही अहवालातून त्यांची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे दर्शवले. यासोबतच जागतिक सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत सोमवारी भारतीय बाजारातील शेअर्स ‍वधारले. आठवड्याच्या अखेरीस तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वाढ नोंदवल्याच्या पार्श्वभूमीवर ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे शेअर्स प्रत्येकी १ टक्क्याने वाढले.

हे ठरले टॉप गेनर्स

सेन्सेक्सवर टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक हे टॉप गेनर्स होते. यांचे शेअर्स सुमारे १ टक्क्याने वधारले. कोटक बँक, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, एसबीआय, एचडीएफसी, एचयूएल या शेअर्संनीदेखील तेजीत व्यवहार केला. तर एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, आयटीसी, मारुती आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे शेअर्स घसरले. क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी पीएसयू बँक १.१० टक्के आणि निफ्टी ऑटो ०.६२ टक्क्याने वाढला. निफ्टी मेटल आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसनेदेखील तेजीत व्यवहार केला.

ICICI चा शेअर वधारला, येस बँकेचा शेअर घसरला

३१ डिसेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत नफ्यात ३४ टक्के वाढ झाल्याची घोषणा केल्यानंतर ICICI बँकेचा शेअर १.५ टक्के वाढून ८८३.९० रुपयांवर गेला. दरम्यान, तिमाहीतील निव्वळ नफ्यात घट नोंदवल्यानंतर येस बँकेचा शेअर १२.४ टक्क्यांनी घसरून १८.३५ रुपयांवर आला. तर अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्सवर दबाव दिसून आला. हा शेअर्स सुमारे ३ टक्क्यांनी खाली आला. या कंपनीच्या नफ्यात ३८ टक्क्यांनी घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर अल्ट्राटेकचे शेअर्स घसरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रिजचे शेअर तेजीत राहिला. हा शेअर्स १ टक्क्याने वाढला आहे.

FII कडून १९,८८० कोटींच्या शेअर्सची विक्री

दरम्यान, चालू जानेवारी महिन्यात आतापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय शेअर बाजारातील एकूण १९,८८० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १६,१८२ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे. गेल्या शुक्रवारी परदेशी गुंतवणूकदारांनी २,००२ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १५०९ कोटींच्या शेअर्सची खरेदी केली.

जगभरातून तेजीचे संकेत

शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाले होते. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज ३३० अंकांनी वाढून ३३,३७५ वर स्थिरावला होता. तर S&P 500 हा १.८९ टक्के वाढून ३,९७२ वर आणि टेक-हेविवेट निर्देशांक नॅस्डॅक २८८ अंकांनी वाढून बंद झाला होता. आज सोमवारी सुट्टीमुळे आशियातील बहुतांश बाजार बंद होते. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक १.३३ टक्के म्हणजेच ३५२ अंकांनी वाढून २६,९०६ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक ०.९६ टक्के वाढून १,९४५ वर पोहोचला. (Stock Market Updates)

 हे ही वाचा :

Back to top button