1 फेब्रुवारी 2023 ला केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन, अर्थसंकल्प विस्ताराने मांडतील. ज्या क्षेत्रात उत्पादन वाढण्याची व त्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्न (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन) वाढेल, व्यक्तिगत उत्पन्न वाढेल त्याचा परिणाम वित्तीय तूट कमी होण्यात होईल. वित्तीय तूट कमी झाली, तर इतर देशांतून गुंतवणुकीला जास्त उत्तेजन मिळेल. ही तूट 5.8 टक्के इथपर्यंत आणण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात बरीच पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे.
भारत 2000 पर्यंत एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जायचा. आता औद्योगिक उत्पादन क्षेत्र आणि सेवा क्षेत्र या दोन्हीतील विस्तार लक्षणीय आहे. म्हणून भारत आता विकसनशील देश म्हणून ओळखला जाण्याऐवजी अमेरिका, युरोपीय देश, ग्रेट ब्रिटन, हॉगकाँग, सिंगापूर याप्रमाणे विकसित देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्याचा फायदा निर्यात वाढीतही होत आहे. रिझर्व्ह बँकेकडील परकी चलनाचा साठा आणि सोन्याचा साठाही वाढू लागला आहे.
अवैध मार्गांनी (स्मगलिंग करून) अनेक प्रकारच्या दुय्यम दर्जाच्या ग्राहकोपयोगी वस्तू परदेशातून सध्या येत आहेत. त्याचप्रमाणे बनावट उत्पादनेही मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यावर कसे नियंत्रण आणायचे, याचा गांभीर्याने कसा विचार करायचा, हे अर्थमंत्र्यांना ठरवावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थमंत्र्यांच्या मागे भक्कमपणे उभे असल्याने त्यांना धाडसी पावले उचलण्यासाठी हिंमत येत आहे. एका बाजूने सकल राष्ट्रीय उत्पादन वाढले (जीडीपी) आहे. महागाई (Inflation) कमी होत आहे. त्यामुळे लोकांचा विचार सध्या आर्थिक गुंतवणुकीऐवजी वस्तू खरेदी करण्यात होत आहे. या वस्तूंच्या खरेदीमुळे राहणीमान सुधारते. मध्यमवर्गीयांचे उत्पन्न या वस्तू खरेदीमध्ये जात असल्यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी येणारी रक्कम तुलनेने कमी येेत आहे.
कंपन्यांनी चांगल्या नफ्याचे आकडे दाखवले, तरीही गुंतवणूकदारांना त्याचे आकर्षण राहिलेले नाही. परिणामी, शेअर बाजारातील निर्देशांक दोलयमान आहे. कंपन्या जेव्हा त्रैमासिक रिझल्टमध्ये विक्री व नफ्याचे आकडे दाखवतात तेव्हा तात्पुरता निर्देशांक वर जातो. कारण, सेन्सेक्सच्या उभारणीत असलेल्या 30 कंपन्यांपैकी लार्सन अँड टूब्रोे, हिंदुस्थान युनिलिव्हर, एच.डी.एफ.सी. एच.सी.एल. टेक्नालॉजीज, एचडीएफसी बँक व रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग वाढले आहेत व वाढत राहणार आहेत.
पंधरा दिवसांनी जेव्हा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा करमुक्त मर्यादेत वाढ हाईल. म्हणूनच येत्या अर्थसंकल्पात करविषयक नव्या घोषणा केल्या जातील. अर्थसंकल्पात करमुक्त मर्यादा वाढल्यास करातून सुटलेली रक्कम नव्या गुंतवणुकीकडे वळेल. नेहमीच्या इन्फोसिस लार्सन अँड टूब्रो, विप्रो, एचडीएफसी बँक, हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC), भारती एअरटेल, एन.टी.पी.सी. आयटीसी यांचे समभाग वधारतील. हे जेव्हा परत 15 टक्के खाली येतील तेव्हा खरेदी करावेत. ही सर्व चकाकती रत्ने आहेत.
टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसिंड बँक, नेसले इंडिया, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक व रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग पडले; पण ते याहूनही खाली गेले, तर ते जरुर घ्यावेत.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील प्रकल्पात 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून कंपनीने या प्रकल्पात जोड म्हणून प्रीमियम फ्रिजचे उत्पादन करणार आहे. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 2 लाख फ्रिजचे उत्पादन केले जाणार आहे. त्यामुळे निर्यातीत लक्षणीय भर पडेल. भारत हा एक उष्ण कटिबंधातील देश असल्यामुळे इथे रेफ्रिजरेटर्सना भरपूर मागणी असते. मध्यमवर्गीयांसाठी आता ही वस्तू अटळ झाली आहे.
लोकांचा कल आता गृहोपयोगी सुखसाधने खरेदी करण्याकडे वाढला आहे.सहकार क्षेत्रातील संस्था व कंपन्यांकडून उत्पादित होत असलेल्या वस्तूंची व सेवांची निर्यात मोठ्या प्रमाणात होण्यासाठी राष्ट्रीय निर्यात सहकार सोसायटी स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षी योजना केेंद्र सरकारने केली आहे. या कामाला गती येण्यासाठी सहकार क्षेत्रातील पाच अग्रणी राष्ट्रीय स्तरावरील कंपन्या एकत्र आल्या आहेत. या सोसायटीचे अधिकृत भाग भांडवल 2000 कोटी रुपयांचे असेल.पेट्रोल आणि डिझेल या पारंपरिक इंधनांचा वापर मर्यादित ठेवण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणावर इथेनॉल मिसळण्यासाठी केेंद्र सरकार उत्तेजन देत आहे.
इथेनॉल हे साखर उद्योगातून 'बॉय प्रॉडक्ट' म्हणून मिळते. बलरामपूर शुगर, डालमिया शुगर वगैरे कंपन्यांतून याचे उत्पादन होते. चालू वर्षाअखेर इथेनॉलचे उत्पादन 25 टक्क्यांनी वाढून 1250 कोटी लिटर होईल. साखरेचे (साखर कंपन्यांचे) वर्ष सप्टेंबरअखेर संपते. काही प्रमाणात मका, ज्वारी यातूनही इथेनॉल मिळू शकते.नवीन वर्षात (2023) जागतिक स्तरावर मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा परिणाम बेरोजगारी वाढण्यावर होणार आहे.या आठवड्यात प्रजासत्ताक दिन आहे. यावेळेला बर्याच मोठ्या धडक योजना जाहीर होतात.
डॉ. वसंत पटवर्धन