

आंबोली : पुढारी वृत्तसेवा : दोडामार्ग- आंबोली राखीव वनक्षेत्रात तथा आंबोली वनपरिक्षेत्रात आता वन्यजीव पर्यटन आणि जंगल पर्यटन निगडीत विविध अॅक्टिव्हिटीज् अधिकृतरित्या पर्यटकांसाठी खुल्या होणार आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना तसेच अभ्यासकांना वन्यजीव पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. यामुळे आंबोली परिसरात पर्यटनवाढीसह रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. यासंदर्भात नुकतेच वनविभागाचे कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांच्यासह सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सीसीएफओ फॉरेस्टचे अधिकारी, ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिक यांच्यात प्रथमच बैठक झाली. बैठकीत वनविभागाकडून शासनामार्फत वन्यजीव पर्यटन निगडीत प्राथमिक माहिती देण्यात आली. (Wildlife tourism)
दोडामार्ग, आंबोली वनपरिक्षेत्रात विविध वन्यजीवांसह जैवविविधतेने भरलेले जंगल असल्याने या वनपरिक्षेत्राला राज्यातील महत्वाचे वनक्षेत्र पाहिले जाते. वन्यजीव पर्यटन हा एक महत्वाचे पर्यटनातील केंद्र असल्याने आंबोली वनपरिक्षेत्रात वन्यजीव पर्यटनसह जंगल सफर, भ्रमंती आदी अॅक्टिव्हिटीज् करण्यास विविध वनविभागच्या निर्बंधांमुळे तांत्रिक बाबी उद्भवत होत्या,त्यामुळे गेले काही वर्षे आंबोली वनपरिक्षेत्रात इतर मोठ्या व्याघ्र प्रकल्प तथा अभ्यरण्या प्रमाणे वन्यजीव पर्यटन तथा जंगल भ्रमंती, जंगल सफर सारखे पर्यटन अधिकृतरित्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आंबोली टुरिझममार्फत विविध स्तरावर करण्यात येत होती. जेणेकरुन स्थानिकांना रोजगार मिळण्यासह येथील पर्यटनात वाढ होईल.
मात्र, वन्यजीव पर्यटनासाठी अद्यापही येथे अधिकृतरित्या वनविभागकडून मान्यता मिळत न्हवती, परंतु, आता दोडामार्ग-आंबोली राखीव वनपरिक्षेत्रात तथा आंबोली वनपरिक्षेत्रात पर्यटनवाढ व रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासन जीआरनुसार सदर वनपरिक्षेत्रातील गावांतील स्थानिक, व्यावसायिक आणि वनविभाग यांच्यामार्फत अधिकृत वन्यजीव पर्यटन व जंगल भ्रमंती व जंगल सफर करता येणार आहे. यामुळे आंबोली पर्यटनात मोठी वाढ तसेच बदल होणार असल्याचे स्थानिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी शासनाच्या जीआर नुसार प्रथमच स्थानिकांची ११ सदस्यांची समिती बनवली जाणार आहे. त्यानंतर वनविभागकडून अधिकृत गाईड ओळखपत्रे, स्थानिकांना आवश्यक प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हेही वाचा