

कागल, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या तळमळीने कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आभा कार्ड नोंदणी घरोघरी केली. गोरगरिबांच्या आरोग्यसेवेचे हे काम महाराष्ट्रात उच्चांकी आहे, असे प्रतिपादन आ. हसन मुश्रीफ यांनी केले.
या दोन्हीही आरोग्य विमा योजनतेंर्गतकागल शहरातील नोंदीत झालेल्या आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्डांचे वितरण सोमवारी (दि. 23) कागलमध्ये होणार आहे. सकाळी दहा वाजता श्री शाहू हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
आ. मुश्रीफ म्हणाले, प्रधानमंत्री जनआरोग्य म्हणजेच आयुष्यमान भारत ही पाच लाख वैद्यकीय विमा सुरक्षेची योजना आहे. आभा कार्ड ही दीड लाख रुपयांची वैद्यकीय विमा सुरक्षेची योजना आहे. संपूर्ण मतदारसंघात गावनिहाय ही मोफत सेवा देण्याचे अभियान सुरू आहे. केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, आ. मुश्रीफ यांची राजकारणापेक्षा समाजकारण हीच खरी कारकीर्द आहे. राजकीय आणि सामाजिक वाटचालीत त्यांनी जनसेवेलाच सातत्याने प्राधान्य दिले आहे.
आयुष्यमान भारत आणि आभा या दोन्ही योजनांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण कागल शहरभर 12 हजारांहून अधिक कार्डांची नोंदणी केलेली आहे. या सर्व नागरिकांना आ. हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने ही कार्ड मोफत दिली जाणार आहेत.
यावेळी प्रवीण काळबर यांचे भाषण झाले. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे, शहराध्यक्ष संजय चितारी, संदीप भुरले यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते. आभार सतीश घाडगे यांनी मानले.