

पुढारी ऑनलाइन डेस्क : कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सुरू असलेले WFI आणि बृजभूषण यांच्याविरोधातील धरणे आंदोलन मागे घेतले. काल रात्री उशीरापर्यंत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या सरकारी निवासस्थानी जवळ पास 7 तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती चार आठवड्यात निर्णय देईल. या दरम्यान बृजभूषण सिंह कुस्ती महासंघातून स्वतःला बाजूला ठेवून चौकशीला सहकार्य करतील, असे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर धरणे आंदोलन करणा-या कुस्तीपटूंनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. समितीत 6 सदस्य असतील ज्यांच्यामध्ये दोन महिला खेळाडूंचा समावेश असेल.
प्रमुख आंदोलकांपैकी एक ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया म्हणाला, "मंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार आमचा समितीवर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला आनंद आहे की चौकशीची घोषणा झाली आहे. आम्ही आमचा विरोध सध्या मागे घेत आहोत. "
विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह देशातील ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक विजेत्यांसह इतर कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह आणि अन्य काही प्रशिक्षकांवर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. तसेच याप्रकरणाचा निषेध करत बृजभूषण यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. याची गंभीर दखल क्रीडा मंत्रालयाने घेतली आहे. मंत्रालयाने महासंघाच्या कामकाजातील गैरव्यवस्थापनाचे WFI कडे स्पष्टीकरण मागितले आहे.
क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की, हे प्रकरण खेळाडूंच्या भवितव्याशी संबंधित असल्याने मंत्रालयाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. जर WFI निर्धारित वेळेत उत्तर दिले नाही तर क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय क्रीडा विकास संहिता, 2011 च्या तरतुदीनुसार महासंघाविरुद्ध पुढील कारवाई करेल. दरम्यान, 18 जानेवारीपासून सुरू होणारे राष्ट्रीय कुस्ती शिबिर तूर्तास रद्द करण्यात आले आहे. मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर 18 जानेवारी पासून लखनऊ येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये 41 पैलवान, 13 प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह सुरू होणार होते, ते रद्द करण्यात येत आहे.
हे ही वाचा :