Share Market Today : सकारात्मक जागतिक संकेत, तसेच अमेरिका आणि भारतातील महागाई नियंत्रणात आली असतानाही भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात लाल रंगात न्हाऊन निघाले. ऑटो, फायनान्शिअल, एफएमसीजी आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून येत आहे. सकाळी १० च्या सुमारास बीएसई सेन्सेक्स ३११ अंकांनी घसरून ५९,४०० वर तर निफ्टी १७,७०० वर होता. त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास सेन्सेक्सची ही घसरण काही प्रमाणात कमी होऊन तो ५९,८०० वर व्यवहार करत होता.
सेन्सेक्सवर एचसीएल टेकची मोठी घसरण झाली. हा शेअर सुमारे १ टक्क्याने खाली आला. एचडीएफसी, एल अँड टी, रिलायन्स, सन फार्मा, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि एम अँड एम यांचे शेअर्सदेखील घसरले. टाटा स्टील, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, एनटीपीसी आणि एसबीआय यांचे शेअर्स वाढले होते.
क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी ऑइल अँड गॅस ०.३७ टक्के आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ०.२२ टक्क्यानी घसरला. दरम्यान, निफ्टी मेटल आणि निफ्टी पीएसयू बँक उच्च पातळीवर व्यवहार करत आहेत. निफ्टी स्मॉलकॅप ५० हा ०.३५ टक्क्यानी वाढला आणि निफ्टी मिडकॅप स्थिर पातळीवर व्यवहार करत आहे.
डिसेंबरमध्ये ग्राहकपयोगी किमतींमध्ये घसरण दर्शविणारा डेटा समोर आला आहे. यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून कमी व्याजदरवाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक उच्च पातळीवर व्यवहार करुन बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज २१७ अंकांनी वाढून ३४,१९० वर, एस अँड पी ५०० निर्देशांक १४ अंकांनी वाढून ३,९८३ वर आणि नॅस्डॅक कंपोझिट ६९ अंकांनी वधारून १,१११ वर पोहोचला.
शुक्रवारी आशियाई शेअर्समध्ये तेजी होती. अमेरिकेतील महागाई कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. तसेच जपानचे अधिकृत चलन येन सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.८ टक्के वाढून सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. या निर्देशांकाची सलग तिसऱ्या आठवड्यात नफ्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) काल १,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. तर जानेवारीत आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण १५ हजार कोटींची गुंतवणूक बाजारातून काढून घेतली आहे. (Share Market Today)
हे ही वाचा :