Share Market Updates | जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचे वातावरण आहे. त्यात व्याजदरवाढीचे संकेत देणाऱ्या भारत आणि अमेरिकेतील ताज्या महागाई अहवालापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी आज गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली. भारतीय शेअर बाजारातील निर्देशांकांनी गुरुवारी स्थिर पातळीवर सुरुवात केली होती. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांची आजची वाटचाल स्थिर पातळीवरुन घसरणीपर्यंत गेली. सकाळी साडेदहाच्या सुमारास सेन्सेक्स २०० अंकांहून अधिक घसरून ५९,८७० पर्यंत खाली आला. तर निफ्टी १७,८३० पर्यंत खाली आला होता. त्यानंतर सेन्सेक्स १४७ अंकांच्या घसरणीसह ५९,९५८ वर बंद झाला. तर निफ्टी १७,८५८ वर स्थिरावला. आजच्या व्यवहारात सर्वाधिक फटका Paytm ला बसला. हे शेअर्स तब्बल ९ टक्क्यांपर्यंत घसरले.
सेन्सेक्सने १ डिसेंबर २०२२ रोजी ६३,५८३ ची सर्वकालीन उच्चांकी पातळी गाठली होती. या उच्चांकापासून सेन्सेक्सने सुमारे ३,४०० हून अधिक अंक गमावले आहेत. जागतिक आर्थिक मंदीची गुंतवणूकदारांनी धास्ती घेतली आहे. यामुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) बुधवारी सलग चौदाव्या दिवशी विक्रीचा सपाटा कायम राहिला. एनएसईकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल बुधवारी ३,२०० कोटी रुपये किमतीच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. तर सेबीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, रोजच्या व्यवहारातील आठ सत्रांत म्हणजेच २ ते १० जानेवारी दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ८१७.५८ अब्ज डॉलर (८,१७० कोटी) किमतीचे भारतीय शेअर्स विकले आहेत.
अलिबाबा समूहाची संलग्न कंपनी अँट फायनान्शिअलने ब्लॉक डीलमध्ये २ कोटी शेअर्स विकल्याची शक्यता एका रिपोर्टमधून वर्तवण्यात आली आहे. या ब्लॉक डीलच्या पार्श्वभूमीवर, पेटीएम चालवणार्या फिनटेक कंपनी One97 Communications चे शेअर्स आज ८.८२ टक्क्यांनी घसरले. हा शेअर निचांकी ५२८.३५ रुपयांवर आला आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार दुपारच्या सत्रात मोठा ब्लॉक डील झाला ज्यामुळे व्हॉल्यूममध्ये १९.२५ पटीने वाढ झाली. Paytm ने गेल्या महिन्यात ८५० कोटींच्या शेअर बायबॅक प्रोग्रामची घोषणा केली होती. यामुळे पेटीएम शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) नुकतेच डिसेंबर २०२२ तिमाहीचे आकडे जाहीर केले. TCS ची कमी झालेली कमाई, तसेच अमेरिका आणि भारतातील महागाई दराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या दोन अधिकाऱ्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. परिणामी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २०२३ च्या पहिल्या आठ सत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर्स विकले. याचा फटका शेअर बाजाराला बसला आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने डिसेंबरच्या तिमाहीतील कमकुवत कमाईचा अहवाल जाहीर केल्यानंतर २०२३ वर्षाच्या सुरुवातीपासून FII ने त्यांचा विक्रीचा सपाटा पुढे कायम ठेवला. यामुळे गुंतवणूकदारांनी असा कयास लावला आहे की येत्या काही महिन्यांत आयटी क्षेत्राची वाढ संथगतीने राहू शकते.
आजच्या व्यवहारात ऑटो आणि आयटी शेअर्स तेजीत राहिले. पण ऑटो वगळता सर्व क्षेत्रांत घसरण झाली. सेन्सेक्सवर टायटनचे शेअर्स आघाडीवर होते. हा शेअर्स सुमारे १ टक्क्याने वधारला. पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, एनटीपीसी, आयटीसी, एसबीआय, मारुती हेही शेअर्स वाढले. तर एशियन पेंट्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय आणि ॲक्सिस बँक शेअर्समध्ये घसरण दिसून आली. निफ्टी आयटी ०.७१ टक्के आणि निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स ०.४७ टक्क्याने वाढला. तर निफ्टी मेटल आणि निफ्टी पीएसयू बँकमध्ये घसरण झाली. ( Share Market Updates)
अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक बुधवारी मजबूत वाढीसह बंद झाले. कारण महागाईच्या अहवालापूर्वी गुंतवणूकदारांची भूमिका आशावादी राहिली आहे. येथील S&P 500 निर्देशांक ५० अंकांनी म्हणजे १.२८ टक्क्यांनी वाढून ३,९६९ वर बंद झाला. तर Nasdaq Composite १८९ अंकांनी वधारला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज २६३ अंकांनी वाढून ३३,९६७ वर पोहोचला.
अमेरिकेतील शेअर बाजारातील वाढीचा मागोवा घेत आशियाई शेअर बाजारांनी गुरुवारी तेजीत सुरुवात केली. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांक ०.५ टक्के वाढला आणि तो सात महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. (Share Market Today)
हे ही वाचा :