

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात सध्या विक्री होत असलेली जवळपास १५ टक्के प्रोटिन पावडर तसेच फूड सप्लिमेंटस् सुरक्षित नाहीत, असे फूड सेफ्टी स्टँडर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (एफएसएसआय) अहवालातून समोर आले आहे. फूड सप्लिमेंटस्चा वार्षिक बाजार देशात ३१ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, यावरून या पदार्थांची विक्री किती वाढलेली आहे, त्याची कल्पना यावी. पॅथॉलॉजिकल तपासणीतून शरीरात काय काय आणि कशाकशाची कमतरता आहे, ते समोर येते. त्या अहवालानुसारच गरज असल्यास व डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते सप्लिमेंटस् घेणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे, ही बाब यातून स्पष्ट झाली आहे.
जेवणातूनच प्रोटीन मिळते. रोज ३०० ग्रॅम दूध, पनीर, डाळी, अंडी आठवड्यातून ७०० ग्राम मांस घेतल्याने पुरेसे प्रोटीन प्राप्त होते. आयसीएमआरच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार वजनाच्या हिशेबाने ०.८ ते १ ग्रॅम प्रोटीन भरपूर आहे. दीर्घकाळ प्रमाणाबाहेर प्रोटीन घेतल्याने किडनीवर त्याचा विपरित परिणाम होतो. यकृत आणि हृदयाशी संबंधित आजारही जडतात, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.