

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : एटीएममधून ग्राहकांचे पैसे चोरी करण्यासाठी पवन अखिलेश पासवान (२६) या बिहारी पट्ट्याने अनोखी शक्कल लढवली आहे. तो एटीएम (ATM) मशिनमध्ये विशिष्ट ठिकाणी प्लास्टिकची चिप टाकून पैशांवर डल्ला मारत होता. त्याने आतापर्यंत शेकडो लोकांच्या खात्यातून लाखो रुपये लंपास केले आहेत. अशाप्रकारे चोरी करताना तो दिंडोशी पोलिसांच्या तावडीत सापडला आणि त्याची चोरीची अनोखी पद्धत पाहून पोलिसही चक्रावले आहेत. पोलिसांनी त्याच्याजवळून ११ प्लास्टिकच्या पट्ट्या, कात्री, फेविस्टिक, रोख रक्कम आणि अन्य साहित्य जप्त केले आहे.
दिंडोशी पोलीस ठाण्याचे बिट मार्शल रामदास बुरडे हे नेहमीप्रमाणे ४ जानेवारीला पोलीस ठाण्याच्या हद्दीत दफ्तरी रोड, खाऊ गल्ली, मालाड पूर्व स्टेशनजवळ गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमजवळ एक संशयित उभा असल्याची माहिती मिळाली. बुरडे यांनी एटीएम सेंटरजवळ जात आरोपीवर नजर ठेवली. पीने एटीएम सेंटरमध्ये जाऊन एटीएम मशीनमधील पैसे काढण्याच्या पॉईंटवर प्लास्टिक चिकटवण्याचा प्रयत्न केला. बुरडे यांनी मागून जाऊन त्याला प्लास्टिकची पट्टी लावताना रंगेहात पकडले.
बुरडे यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीमध्ये पासवान हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे. तो व्यवसायाने इलेक्ट्रिकल तज्ञ आहे. गेल्या चार महिन्यांपासून तो एटीएम सेंटरमधून पैसे काढत होता. पासवान याच्यावर वसई पोलीस ठाण्यातही एटीएममधून चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे दिंडोशी पोलीस ठाण्याचे वपोनि जीवन खरात यांनी सांगितले. पासवान याला रंगेहाथ अटक करणाऱ्या बीट मार्शल बुरडे यांचा सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
विरारला वास्तव्यास असलेल्या पासवानवर यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. त्याने मालाड व्यतिरिक्त अन्य ठिकाणच्या एटीएम सेंटर्सनाही लक्ष्य केल आहे. त्याने अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली, याची माहिती घेण्यासाठी पोलीस बँकांना पत्र लिहिणार आहेत.
पासवान हा एटीएमच्या कॅश ड्रॉवरच्या बाहेर प्लास्टिकची पट्टी चिकटवून मशिनमधून येणारे पैसे तात्पुरते थांबवत असे. ग्राहक मशिनमध्ये बिघाड झाल्याचा विचार करून निघून गेल्यानंतर तो एटीएम सेंटरमध्ये घुसून लावलेली पट्टी काढून रक्कम घेऊन पसार व्हायचा.
पासवान हा सुरक्षा रक्षक नसलेल्या एटीएम सेंटर्सना लक्ष्य करत होता. त्याने मशीनवरील रोख वितरण करणाऱ्या स्लॉटची लांबी तपासली होती आणि त्याच आकाराच्या प्लास्टिक पट्ट्या कापल्या होत्या. ग्राहकांना संशय येऊ नये म्हणून त्याने प्लास्टिक पट्ट्यांचे रंग फिकट निवडले होते, असे दिंडोशी पोलीस निरीक्षक गजानन पाटेकर यांनी सांगितले.
हेही वाचा