रत्नागिरी : दीपक कुवळेकर : आमदारांच्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण सध्या वाढत आहे. या अपघाताचे ग्रहण सुटता सुटेना. गेल्या आठवड्यात खेड-दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला झालेल्या अपघातानंतर पुन्हा हा विषय चर्चेत आला आहे. आमदार विनायक मेटे यांचा तर या वाहन अपघातात बळी गेला आहे. तर काही आमदार बालंबाल बचावले आहेत. आ. योगेश कदम यांच्या अपघाताबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. (MLA's Accident)
राज्यातील अनेक महामार्गांसह राज्य मार्गवर अपघाताचे सातत्य कायम असून त्यात गेल्या वर्षेभरात राज्यातील विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या वाहनांना अपघात झाले असून, यामध्ये आमदारांच्या वाहनांच्या अपघातांची संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यात पोलादपूर नजीक चोळई येथे आमदार योगेश कदम याच्या वाहनाला अपघात झाल्या नंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून या अपघाताची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. डंपर मागून धडक देऊन बाजूला गटार मध्ये जाऊन कलंडला व चालकाचे घटनास्थळावरून पलायन यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा रंगू लागली असून तर्कवितर्कांचे पेव फुटले आहे.
गेल्या काही वर्षात वाहन अपघात वाढत असून अनेक अपघातात चालकाचे नियंत्रण सुटल्याने होत आहेत. त्यातच १९ ते ३० वयोगटातील अनेक परप्रांतीय चालक हे कंटेनर वा टँकर भरधाव वेगाने चालवत असल्याने वळणावर किंवा उतारावर पलटी होत असतात. या अपघातानंतर उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्या पुरेश्या नसल्याचे दिसून येत आहे.राज्यातील सर्वसामान्य चालक प्रवासी याच्या प्रमाणे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी यांच्या वाहनांच्या अपघातात गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे.
माजी आमदार विनायक मेटे यांचा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरिल वाहन अपघातातील मृत्यूने सारेच हादरले होते. मुंबईमधील इस्टेनीवर महाडचे आमदार भरत गोगावले याच्या वाहनांना अचानक वाहने थांबल्याने अपघात झाला होता. तर गेल्या १५ दिवसात ३ विविध भागांतील आमदारांच्या वाहनांना अपघात झाले आहेत. या मध्ये २४ डिसेंबरला आ १. जयकुमार गोरे याच्या वाहनाला रात्रीच्या सुमारास मळठण येथे अपघात झाला होता तर ४ जानेवारी २३ रोजी आ. धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात झाला होता. ६ जानेवारी २३ रोजी मतदार संघातील कार्यक्रम उरकून मुंबईकडे जाणाऱ्या आ. योगेश कदम यांच्या वाहनाला अपघातात झाला. या अपघात मागून येणाऱ्या डंपरची ठोकर बसल्याने हा अपघात की घातपात होता याबाबत चर्चा रंगू लागली आहे. या अपघाताची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार कदम यांनी सीटबेल्ट लावल्याने ते सुखरूप असले तरी चालक दीपक यास किरकोळ जखम झाली होती.
आमदारांच्या वाहनांच्या अपघाताचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. राज्यातील जवळपास सर्वच आमदारांना पोलिस संरक्षण आहे. त्यामुळे पुरेसे संरक्षण असतानाही अपघात होत आहेत. अपघातामध्ये काहीवेळा वाहन चालकांचा दोष असतोच परंतु, पुरेसे पोलिस संरक्षण असतानाही अपघात होत असल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
हेही वाचा