

कबनूर; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील कोरोची ग्रामपंचायतीचे लोक-नियुक्त सरपंच डॉ. संतोष भोरे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी मारुती मंदिर येथे झालेल्या सरपंच पदाचे ७ पराभूत उमेदवारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. भोरे यांनी पाठविलेल्या नोटीशीला न्यायालयामार्फत उत्तर देणे तसेच त्यांनी निवडणूक विभागास अतिक्रमणाबाबत दिलेल्या चुकीच्या माहिती विरोधात तक्रार देण्याचे ठरविले आहे. यामुळे उपसरपंच पदाच्या निवडीपूर्वीच गावचे राजकारण ढवळून निघाले आहे. (Kolhapur Korochi Sarpanch)
सरपंच पदासाठी डॉ. भोरे यांच्यासह देवानंद कांबळे, लखन कांबळे, संतोष वाघेला, राजेंद्र कसबे, सतीश माने, निखिलराज आवळे व सचिन उर्फ सॅम आठवले असे आठ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. डॉ. भोरे यांचा एक अतिक्रमणाबाबतचा मुद्दा जोरदार चर्चेत होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज छाननीवेळेस भोरे यांचा अर्ज बाद ठरणार का अशी चर्चा होती. मात्र तसे झाले नाही. आठही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले व भोरे हे सरपंच पदी निवडून आले. निवडूण आल्यानंतरही पदाला काही कारणास्तव भोरे यांनी विरोधी ७ उमेदवारांविरोधात जिल्हाधिकारी न्यायालयात कॅव्हीएट दाखल केला. त्यामुळे या ७ उमेदवारांनी भोरे यांच्या निवडीला आव्हान देण्याच्या ठराव सोमवारी (दि. ९) झालेल्या बैठकीत केला आहे. भोरे यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी याविषयी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.
या बैठकीस सुहास पाटील, शांतिनाथ पाटील, नरसू पाटील, आनंदा लोहार, संजय खारकांडे, भैया पिष्टे, रवी कांबळे, पिंटू सुतार, संजय कदम, किशोर जगताप, दयानंद कांबळे, सचिन कारले आदि उपस्थित होते.
मला जनतेने निवडून दिले आहे. माझा विजय काही जणांच्या पचनी पडला नाही. तो त्यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे कांहीजण माझ्या निवडीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत म्हणून पूर्व खबरदारी म्हणून मी कॅव्हीएट दाखल केले आहे. माझा कुणाबाबतही आकस नाही.
डॉ. संतोष भोरे, सरपंच , ग्रा. पं. कोरोची
हेही वाचा